नवी दिल्ली : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपद निवड, कोणाची लागणार वर्णी?

नवी दिल्ली :  भाजप राष्ट्रीय अध्यक्षपद निवड, कोणाची लागणार वर्णी?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड होईल, याबाबत दिल्लीत अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. भाजप अध्यक्षपदासाठी यापूर्वी अमित शाह, शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून हे नेते बाद झाले आहेत.

भाजपच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते सुनील बंसल, अनुराग ठाकूर यांच्यासह महाराष्ट्रातून विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपकडून आयत्यावेळी एखाद्या अनपेक्षित नावासह अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच महिला नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासोबतच लोकसभा अध्यक्षांचीही निवड केली जाणार असल्याने या पदासाठी देखील काही नावे चर्चेत आली आहेत.

जे. पी. नड्डा यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्रीपदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे नड्डा यांच्या जागी नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे. भाजप अध्यक्षपदासाठी सध्या अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सुनील बंसल यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. यासोबतच हिमाचल प्रदेशातून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून महत्वाची जबाबदारी पेलणारे महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

कोण आहेत सुनील बंसल?

सुनील बंसल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. उत्तरप्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बंसल यांनी शहा यांच्यासोबत काम केले आहे. पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचे प्रभारीपदही त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. ओडिशात भाजपची सत्ता आणण्यात आणि तेलंगणामध्ये खासदारांच्या संख्येत वाढ होण्यात सुनील बंसल यांचा मोठा हातभार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी डी. पुरंदेश्वरी आणि माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाची चर्चा आहे.

कोण आहेत, डी. पुरंदेश्वरी?

आंध्रप्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी या दिवंगत नेते आणि तेलगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. यापूर्वी त्या काँग्रेसकडून विशाखापट्टणमच्या खासदार होत्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. पुरंदेश्वरी यांच्या ज्येष्ठ भगिनी या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे भाजप आणि तेलगू देसम पक्षात समन्वय साधण्यासाठी पुरंदेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार?

18 व्या लोकसभेत एनडीएकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटते. असे असले तरी काँग्रेस आणि इंडिया आघाडी मात्र निवडणूक झाली पाहिजे, या भूमिकेत आहेत. भाजपने उमेदवार दिल्यास इंडिया आघाडीचाही उमेदवार लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत असेल. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष पदावर तेलगू देसम पक्षाने उमेदवार द्यावा, तेलगू देसम पक्षाने उमेदवार दिल्यास काँग्रेस आणि इंडिया आघाडी त्या उमेदवाराला समर्थन देईल. परंतु भाजपाने उमेदवार दिल्यास भाजप उमेदवाराच्या विरोधात इंडिया आघाडी उमेदवार देईल, अशी तयारी काँग्रेसने केल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news