India Alliance : सत्तेसाठी इंडिया आघाडीच्या हालचाली, एनडीएतील पक्षांना ओढण्याची रणनीती

India Alliance : सत्तेसाठी इंडिया आघाडीच्या हालचाली, एनडीएतील पक्षांना ओढण्याची रणनीती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान शनिवारी १ जून रोजी पार पडत असतानाच त्याचदिवशी इंडिया आघाडीनेही (India Alliance) बैठक बोलाविली आहे. या बैठकीत कुठल्याही आघाडीत नसलेल्या नव्या पक्षांना इंडिया आघाडीत सामील करून घेण्याबाबत रणनीती आखली जाणार आहे. सध्या एनडीए आघाडीचा घटक असलेल्या काही छोट्या पक्षांना इंडिया आघाडीकडे कसे ओढता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

इंडिया आघाडी 'या' कारणांसाठी बोलावली बैठक

  • सातव्या टप्प्याचे मतदान शनिवारी १ जून रोजी पार पडत आहे
  • कोणत्याच आघाडीत नसलेल्या नव्या पक्षांना सोबत घेण्याबाबत रणनीती
  • एनडीए आघाडीचा घटक असलेल्या काही छोट्या पक्षांवर नजर

सरकार स्थापन होणार असल्याचा इंडिया आघाडीला विश्वास

निवडणूक निकालानंतर केंद्रात आपलेच सरकार स्थापन होणार असल्याचा इंडिया आघाडीला विश्वास आहे. त्यामुळे सरकार बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास एनडीए आघाडीतून बाहेर पडणाऱ्या पक्षांसाठी इंडिया आघाडीचे (India Alliance) दरवाजे खुले केले जाणार आहेत.

इंडिया आघाडीच्या या बैठकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे स्वतः उध्दव ठाकरे सहभागी होणार नसून त्यांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. ही बैठक अनौपचारिक आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीची औपचारिक बैठक घेतली जाणार असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

४ जून रोजी  इंडिया आघाडीची औपचारिक बैठक

निवडणूक निकालाच्या दिवशीच म्हणजे, ४ जून रोजी  इंडिया आघाडीची औपचारिक बैठक बोलाविली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी याआधीच चर्चा करून ४ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक घेण्याची सूचना केली आहे.

इंडिया आघाडीच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस वेणुगोपाल यांच्यासह शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, महबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, कल्पना सोरेन आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आदी नेते सहभागी होणार आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news