

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. बिहारमध्ये सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा झंझावात सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मासे खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. नवरात्रीच्या काळात मासे खाल्याने त्यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. आता बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादव आणि काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाटणा येथील प्रचार सभेनंतर मटणाचा आस्वाद घेतला. त्यांच्या मटण भोजनाचा विषय बिहारच्या राजकारणात चांगला रंगला आहे.
राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये मंगळवारी संयुक्त प्रचार सभा घेतली. दुपारी जाहीर सभेनंतर त्यांनी तेजस्वी यादव आणि मिसा भारती यांच्यासोबत बसून मटणाचा आस्वाद घेतला. यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, राहुलजींनी बिहारमध्ये दोनदा मटण खाल्ले आहे. यावर राहुल गांधी म्हणाले, आता आम्हाला त्यांना ( तेजस्वी यादव) मटण खाण्याचे आमंत्रण द्यावे लागेल. मी आणि माझी बहीण त्यांना मटणाच्या जेवणासाठी आमंत्रित करू.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 9 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरमध्ये मासे खातानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. हेलिकॉप्टर उड्डाण करताना विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) चे प्रमुख मुकेश साहनी यांच्यासोबत जेवत असतानाचा हा व्हिडिओ तेजस्वी यादव यांनी शेअर केला होता. यामध्ये तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी मासे आणि रोटीचा आस्वाद घेताना दिसत होते. यावेळी तेजस्वी यादव यांनी निवडणूक काळात मला असेल झटपट जेवावे लागते, असेही म्हटलं होते. मात्र त्यांच्या या व्हिडिओवर भाजपने हल्लाबोल केला होता. श्रावणात मटण खाणे आणि नवरात्रीमध्ये मासे खाणे हे सनातनी धर्माच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत तेजस्वी यादव हे मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी केला होता. आता तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या मटण जेवण्याचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा :