Lok Sabha Election : मातब्बर उमेदवारांमुळे चंदीगडमध्ये तीव्र चुरस

Lok Sabha Election
Lok Sabha Election

सुशिक्षित आणि उच्चभ्रूची वस्ती उच्चविद्याविभूषित उमेदवार व तापलेली राजकीय हवा अशा वातावरणात एक जून रोजी चंदीगडचा मतदार मतदानाला सामोरा जात आहे. त्यात बाजी कोण मारणार, हे 4 जूनला स्पष्ट होईल. दोन्ही उमेदवारांना विजयाची समान संधी आहे.

पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी असलेले चंदीगड शहर प्रत्यक्षात केंद्रशासित प्रदेश आहे. विख्यात फ्रेंच वास्तू रचनाकार ले कॉर्बुझिये यांनी 1953 मध्ये 114 चौरस किलोमीटर क्षेत्रात ही सर्वांगसुंदर नगरी वसविली. स्वतंत्र भारतात बांधले गेलेले हे पहिलेच पूर्वनियोजित शहर असून, यावेळी चंदीगडमध्ये लोकसभेची निवडणूक चुरशीने लढली जात आहे. लागोपाठ दोनदा येथून लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या किरण खेर (प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची पत्नी) यांचा पत्ता कट करून भाजपने यावेळी संजय टंडन यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसनेही माजी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांच्याऐवजी आणखी एक माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांना येथून संधी दिली आहे. दोन्ही उमेदवार मातब्बर असल्यामुळे विजय कोणाला मिळणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

टंडन यांना विजयाचा विश्वास

टंडन यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले असल्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक हा विषय नवखा नाही. टंडन कुटुंब मूळचे पंजाबमधील अमृतसरचे. त्यांंचे वडील बलरामदास टंडन हे स्वातंत्र्यसैनिक आणि नंतर छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. नंतर ते चंदीगडमध्ये स्थायिक झाले. पेशाने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौंटंट) असलेल्या संजय यांचे सगळे शिक्षण चंदीगडमध्येच झाले आहे. चंदीगडबरोबरच हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी म्हणून त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.

दांडगा जनसंपर्क, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वलय आणि केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत बजावलेली कामगिरी या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. या बळावर आपण मैदान मारू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चंदीगड भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. स्थानिक आणि बाहेरचे हा वाद संपुष्टात आला आहे. स्वतः किरण खेर यांचेही चांगले सहकार्य आपल्याला मिळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तिवारी यांना पक्षातून विरोध

काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी हे आनंदपूर-साहिब लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. पवन बन्सल यांचे तिकीट कापून तिवारी यांना उमेदवारी दिल्यामुळे बन्सल समर्थक संतापले आहेत. बन्सल यांनी आठ वेळा लोकसभा लढवली असून, चार वेळा ते निवडून गेले आहेत. त्यांच्या समर्थकांना शांत करण्यासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागली. माजी केंद्रीय मंत्री असलेले तिवारी हेही उच्चविद्याविभूषित आहेत. बीए आणि एलएलबी अशा दोन पदव्या त्यांच्याकडे आहेत. त्यांचे वडील प्राध्यापक, तर मातोश्री पंजाब पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता (डीन) म्हणून कार्यरत होत्या.

स्वतः मनीष यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले असून, त्याचबरोबर ते केंद्रीय मंत्रीसुद्धा होते. यावेळच्या निवडणुकीत बन्सल समर्थक त्यांना कितपत साथ देणार, यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. या मतदार संघात प्रामुख्याने सुशिक्षित आणि उच्चभ्रूंचा भरणा आहे. त्यामुळे येथील लढत अटीतटीने लढली जात असून, दोन्ही उमेदवारांचा प्रचार धडाक्यात सुरू आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news