Cyclone Remal Updates | ‘रेमल’ने हाहाकार, पश्चिम बंगालमध्ये दोघांचा मृत्यू | पुढारी

Cyclone Remal Updates | 'रेमल'ने हाहाकार, पश्चिम बंगालमध्ये दोघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : ताशी १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह तीव्र चक्रीवादळ ‘रेमल’ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री धडकले. या चक्रीवादळाच्या तडाख्याने बंगालमध्ये हाहाकार उडाला आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

दोघांचा मृत्यू

चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये पश्चिम बंगालमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. कोलकाता येथील एंटली येथे काँक्रीटचा काही भाग कोसळल्याने ५० वर्षीय मोहम्मद साजिद यांचा मृत्यू झाला. तसेच रेणुका मोंडल नावाच्या ८० वर्षीय महिलेचा दक्षिण २४ परगणामधील फ्रेजरगंज येथे झाड पडल्याने मृत्यू झाला.

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या लगतच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री ८:३० वाजता सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान मोंगलाच्या नैऋत्येला या चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू झाली. रेमलच्या तडाख्याने पश्चिम बंगालमधील अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली सापडून एकजण जखमी झाला.

Cyclone Remal
Cyclone Remal

बांगलादेशचा किनारी भाग आणि लगतच्या पश्चिम बंगालवरील रेमल तीव्र चक्रीवादळ २७ मे रोजी सकाळी ५.३० वाजता कॅनिंगच्या ७० किमी ईशान्येला आणि मोंगलाच्या ३० किमी पश्चिम नैऋत्येस कमकुवत झाले. हे वादळ आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. रेमल चक्रीवादळ गेल्या सहा तासांत १३ किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले आणि बांगलादेश आणि जवळच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकले.

चक्रीवादळ ‘रेमाल’मुळे पश्चिम बंगालच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमान उड्डाणांना यामुळे विलंब झाला.

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणामधील संदेशखाली येथे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सागर बेटाजवळ झाडे उन्मळून पडली आहे. येथे एनडीआरएफकडून मदतकार्य सुरु आहे.

मुसळधारेचा इशारा

२७ मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आणि बांगलादेशला लागून असलेल्या गंगेच्या पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button