राष्ट्रपती रायगड दौरा : हेलिपॅडला विरोध झाल्याने राष्ट्रपती रायगडावर ‘रोप वे’ने जाणार | पुढारी

राष्ट्रपती रायगड दौरा : हेलिपॅडला विरोध झाल्याने राष्ट्रपती रायगडावर 'रोप वे'ने जाणार

रायगड, पुढारी ऑनलाईन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड दौरा हेलिपॅडला झालेल्या विरोधामुळे चर्चेत आहे.  त्यामुळे राष्ट्रपती कोविंद यांनी रोप वेने रायगडावर जाण्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे दिली आहे.

हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान, आमदार भरत गोगावाले यांच्यासह अन्य संघटनांनी होळीच्या माळावरील हेलिपॅडला विरोध केला होता. राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्यासाठी रायगडासह पाचाड आणि अन्य ठिकाणी सात हेलिपॅड तयार करण्यात आली होती. मात्र, होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हेलिपॅड करण्यास काही संघटनांनी विरोध केला होता. याबाबत महाडच्या प्रांताधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी विरोध करणाऱ्यांची समजूत काढली होती. त्यानंतर हेलिपॅड तयार करण्यास अनुमती दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही संघटनांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत जर राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर हे हेलिपॅड काढून टाकणार असाल तरच हेलिपॅड तयार करण्यास परवानगी देऊ, तसे पत्र द्या, असा आग्रह धरला.

आज ( दि. ४ )  खासदार संभाजीराजे यांनी दुपारी ट्विट करून राष्ट्रपती कोविंद यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी रायगडावर हेलिकॉप्टरने न जाता रोप वेने जाणार आहेत, अशी माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्‍थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोप वेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.’

राष्ट्रपती रायगड दौरा : आमदार गोगावले यांनी केला विरोध

शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे व मिलेनियम प्रॉपर्टीजच्या रोपवेच्या नवीन ट्रॉलीचे लोकार्पण करताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी रायगडावरील हेलिपॅडला विरोध केला. होळीच्या माळावरील छत्रपतींचा असलेला सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासमोर हेलिकॉप्टर उतरवण्यास आपला विरोध कायम असल्याचे ते म्हणाले.


हेही वाचा : 

Back to top button