Southwest Monsoon | मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल, ‘या’ राज्यांत मुसळधारेचा इशारा | पुढारी

Southwest Monsoon | मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल, 'या' राज्यांत मुसळधारेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सून (Southwest Monsoon) ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या नैऋत्येला लागून असलेल्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला (IMD) आहे.

मान्सून दक्षिण अरबी समुद्रात

अनुकूल वातावरणामुळे मान्सूनची आगेकूच वेगाने सुरूच आहे. दरम्यान, मान्सूनने आज २२ मे रोजी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राचा भाग व्यापला आहे.

“नैऋत्येला लागून असलेल्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते ईशान्येकडे सरकेल आणि २४ तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होईल. ते ईशान्येकडे पुढे सरकेल आणि त्यानंतर ते आणखी तीव्र होईल,” असे हवामान विभागाने म्हटले आहे.

या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळला रेड अलर्ट जारी केला असून दक्षिणेकडील राज्यांमध्ये २५ मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, पाँडेचेरी, कराईकल भागांमध्ये २४ मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

२३ मे रोजी कर्नाटकची किनारपट्टी आणि अंतर्गत काही भागांमध्येही अशीच हवामानाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये २६ मे रोजी मुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हरियाणातील सिरसा ४७.८ अंशांवर

दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र उष्णतेच्या लाट (heat wave) कायम आहे. हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांच्या भागात तीव्र उष्णता कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, हरियाणातील सिरसा येथे २१ मे रोजी कमाल तापमान ४७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

पुढील ५ दिवसांत ‘या’ भागांत तीव्र उष्णतेची लाट

पुढील ५ दिवसांत वायव्य भारतातील मैदानी भागात तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Back to top button