Rajasthan | लिफ्ट कोसळल्याने ५७७ मीटर खोल खाणीत अडकलेल्या १४ जणांची सुटका

Rajasthan
Rajasthan

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या (Rajasthan) झुंझुनू जिल्ह्यातील हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत मंगळवारी रात्री लिफ्ट कोसळल्याने कोलकाता दक्षता पथकाच्या सदस्यांसह अडकलेल्या १४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. खाणीत ५७७ मीटर खोलवर रात्रभर बचाव कार्य सुरू होते. आज सकाळी प्रथम तीन लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यानंतर उर्वरित ११ लोकांना बाहेर काढण्यात आले.

तांब्याच्या खाणीत लिफ्ट कोसळली वाचा ठळक मुद्दे

  • हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत मंगळवारी रात्री लिफ्ट कोसळली होती
  • कोलिहान खाणीत ५७७ मीटर खोल अडकलेल्या १४ जणांची सुटका झाली आहे.
  • राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी १४ जणांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या. 
  • १४ अधिकाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी जयपूरला नेण्यात आले आहे.

मंगळवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दक्षता पथक खाणीत तपासणीसाठी गेले असता ही घटना घडली होती. अधिकारी वर येत असताना लिफ्टची साखळी तुटली. यामुळे दक्षता पथकासह १४ कर्मचारी खाणीत अडकले होते. त्यानंतर बचावकार्य सुरू होते. आज सकाळी सर्वांची सुटका झाली.

तिघांची प्रकृती गंभीर

यातील तिघांना प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जयपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. झुंझुनू सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण शर्मा यांनी सांगितले की, "खाणीत अडकलेल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे." रुग्णालयाचे कर्मचारी शिश्राम यांनी सांगितले की, "काही लोकांच्या हाताला तर काहींच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत, बाकीचे सुखरूप आहेत. बचावकार्याला यश आले आहे."

मदतकार्य करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना

खेत्री, झुंझुनू येथील हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीमध्ये लिफ्टची दोरी तुटल्याने झालेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बचाव कार्य आणि बाधित लोकांना सर्व मदत आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news