द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी भाजप नेते के. अण्णामलाईंना माेठा दिलासा, सुप्रीम कोर्टाची कारवाईला स्थगिती | पुढारी

द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी भाजप नेते के. अण्णामलाईंना माेठा दिलासा, सुप्रीम कोर्टाची कारवाईला स्थगिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अण्णामलाई यांना आज (दि.२९) सर्वोच्‍च न्‍यायालयाने मोठा दिलासा दिला. या प्रकरणी खटल्‍याच्‍या कारवाईला स्‍थगिती देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत. अण्णामलई यांच्यावर ऑक्टोबर 2022 मध्ये एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ख्रिश्चनांच्या विरोधात कथितपणे द्वेषपूर्ण भाषण दिल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी ९ सप्‍टेंबरपसून सुरु होणार्‍या आठवड्यात सुनावणी होईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

सहा आठवड्यांच्या आत उत्तर देण्‍याचे तक्रारदाराला आदेश

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने प्रतिवादीने प्रति शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. अन्नामलाई यांनी द्वेषयुक्त भाषण प्रकरण रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने तक्रारदाराला सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले. तसेच अंतरिम आदेश कायम राहणार असल्याचे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. तसेच 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात हे प्रकरण पुन्हा सूचीबद्ध केले जाईल, असेही सांगितले. तत्पूर्वी, सुनावणीला सुरुवात होताच खंडपीठाने सांगितले की, ही खाजगी तक्रार असून, या प्रकरणात राज्य सरकारला पक्षकार करण्यात आलेले नाही.

आजच्‍या सुनावणीत ज्‍येष्‍ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी तक्रारदार व्ही पीयूषची बाजू मांडत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. 26 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने अण्णामलाई यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या कारवाईला स्थगिती दिली होती. मुलाखतीत दिलेली विधाने ऐकल्यानंतर खंडपीठाने म्हटले होते की, ‘प्रथम दर्शनी, कोणतेही द्वेषयुक्त भाषण नाही. एकही केस काढली जात नाही.

काय प्रकरण आहे?

अन्नामलाई यांनी22 ऑक्टोबर 2022 रोजी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की, एका ख्रिश्चन एनजीओने सणाच्या वेळी फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी न्‍यायालयात खटला दाखल केला होता. भाजप नेत्याने जाणीवपूर्वक खोटे बोलून जातीय द्वेषाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तक्रारदाराने आपल्या याचिकेत केला आहे.

हेही वाचा :

 

Back to top button