Lok Sabha elections PM Narendra Modi | पीएम मोदींवर ६ वर्ष निवडणूक बंदीची मागणी, दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली | पुढारी

Lok Sabha elections PM Narendra Modi | पीएम मोदींवर ६ वर्ष निवडणूक बंदीची मागणी, दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ६ वर्षांची निवडणूक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी (२९ एप्रिल) फेटाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवाच्या आणि धर्माच्या नावाने मते मागितल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीसाठी देव आणि मंदिरांच्या नावावर भाजपसाठी मते मागितल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाला (ECI) निर्देश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. ही याचिका सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (Lok Sabha elections PM Narendra Modi) दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि न्यायालय कोणत्याही तक्रारीवर विशिष्ट कार्यवाही करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देऊ शकत नाही.

पीएम मोदी यांनी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे केलेल्या भाषणात, मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू मंदिरे तसेच शिखांच्या प्रार्थना स्थळांच्या नावाने भाजपला मतदान करण्याचे आवाहन करून मते मागितली होती, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाची बाजू मांडणारे वकील सिद्धांत कुमार यांनी या याचिकेला विरोध केला. अशा अर्जांवर कायद्यानुसार कारवाई होईल. या प्रकरणी निवेदन दाखल केले असून आम्ही त्यावर कार्यवाही करू. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, असे त्यांनी म्हटले.

निवडणूक आचारसंहितेचे (एमसीसी) उल्लंघन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. पण ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. आनंद एस. जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत पीएम मोदींना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यांनी याचिकेत म्हटले होते की, पीएम मोदींनी ६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे निवडणूक प्रचार सभेत भाजपसाठी मते मागताना हिंदू आणि शीख देवतांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, भारतातील इंडिया आघाडीतील पक्षांनी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा नेहमीच तिरस्कार केला.

पिलीभीतमध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

“५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले गेले. इंडिया आघाडीचे लोक राम मंदिराच्या उभारणीपूर्वीही द्वेष करत होते आणि आजही द्वेष करतात. मंदिर बांधू नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज ज्या काँग्रेससोबत समाजवादी पक्ष उभा आहे, त्यांनी १९८४ मध्ये आमच्या शीख बंधू-भगिनींचे काय केले ते कोणीही विसरू शकत नाही. हा भाजप आहे, जो शिखांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. भाजपने लंगरच्या वस्तूंवरील जीएसटी हटवला.” असे वक्तव्य पीएम मोदी यांनी पिलीभीतच्या प्रचार सभेत केले होते.

हे ही वाचा :

 

Back to top button