Stock Market Closing Bell | ४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात जोरदार रिकव्हरी, सेन्सेक्स ५९९ अंकांनी वाढून बंद, नेमकं काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | ४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात जोरदार रिकव्हरी, सेन्सेक्स ५९९ अंकांनी वाढून बंद, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरुवातीच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि.१९) जोरदार रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स ५९९ अंकांनी वाढून ७३,०८८ वर बंद झाला. तर निफ्टी १५१ अंकांनी वाढून २२,१४७ वर स्थिरावला. गेल्या ४ ट्रेडिंग सत्रात घसरण झाली होती. पण शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात या घसरणीला ब्रेक लागला आणि सेन्सेक्स, निफ्टी वधारून बंद झाले. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय आघाडीवर काय परिस्थिती?

क्षेत्रीय आघाडीवर बँक आणि मेटल निर्देशांक प्रत्येकी १ टक्के आणि एफएमसीजी निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढला. तर हेल्थ केअर, आयटी, पॉवर आणि रियल्टी ०.३-०.६ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.४ टक्क्यांनी घसरून बंद झाला.

…अन् घसरण थांबली

बाजारात आज काही प्रमाणात इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम दिसून आला. इस्रायलने बदल्याची कारवाई म्हणून इराणवर हल्ला केला. यामुळे मध्यपूर्वेत भू-राजकीय तणाव वाढला आहे. यामुळे बेंचमार्क इक्विटी निर्देशांक शुक्रवारी सलग पाचव्या सत्रात घसरणीसह खुले झाले होते. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी घसरून ७१,८९० पर्यंत खाली आला होता. तर निफ्टी २१,९०० च्या खाली आला होता. पण त्यानंतर दिवसाच्या निचांकी पातळीपासून सेन्सेक्स १,१०० अंकांनी वाढला. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी, मेटल, ऑटो आणि पीएसयू बँकिंग शेअर्समध्ये झाली.

बाजारात जोरदार रिकव्हरी

इराणने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, इस्रायलकडून कोणताही क्षेपणास्त्र हल्ला झालेला नाही आणि जे काही स्फोट झाले ते इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा सक्रियतेसाठी करण्यात आले. या वृत्तानंतर बाजारात तेजी परतली. दुपारी दीडच्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीच्या दिशेने वाटचाल केली.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्स आज ७१,९९९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३ हजारांपर्यंत वाढला. सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचा शेअर्स टॉप गेनर ठरला. हा शेअर्स ३ टक्क्यांनी वाढून ७,१११ रुपयांवर गेला. त्यासोबतच एम अँड एम, एचडीएफसी बँक, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा हे शेअर्सही १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, एलटी, टीसीएस, टाटा मोटर्स, इन्फोसिस या शेअर्समध्ये घसरण झाली.

BSE Sensex
BSE Sensex

निफ्टीवर बजाज फायनान्स, एम अँड एम, एचडीएफसी बँक, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. तर बजाज ऑटो, नेस्ले इंडिया, डिव्हिज लॅब, एचसीएल टेक आणि एलटी हे शेअर्स टॉप लूजर्स होते.

NIFTY 50
NIFTY 50

परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले २० हजार कोटी

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) ४ ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय बाजारातून सुमारे २० हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. इराण-इस्रायल युद्ध आणि भारत-मॉरिशस कर करारातील बदल आदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर दिसून येत आहे. आज सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीवर सुरुवातीच्या व्यवहारात दबाव दिसून आला. (Stock Market Closing Bell)

इन्फोसिसचा शेअर्स घसरला

आयटी सेवा कंपनी इन्फोसिसचे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात २ टक्क्यांनी घसरले. आजच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर्स १,३७९ रुपयांपर्यंत खाली घसरला. त्यानंतर दुपारच्या सत्रात हा शेअर्स १,४१२ रुपयांवर आला. इन्फोसिसने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ३७,९२३ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. तर नफा ७,९६९ कोटी रुपये झाला. पण इन्फोसिसचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

हे ही वाचा :

 

Back to top button