Chicken 65 : चिकन 65 नावाची स्‍टाेरी लयभारी

Chicken 65 : चिकन 65 नावाची स्‍टाेरी लयभारी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्या कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यात एक पदार्थ लईच फेमस हाय… इथं कुठल्याबी चौकात जावा. पुण्या-मुंबईसारख्या चायनीजच्या गाड्या दिसत नाय. तर इथं फक्त अन् फक्त चिकन-65 च्याच (Chicken 65) गाड्याच दिसत्यात. अयssss दाद्या! कमी समजू नको आपल्या चिकन-65 ला… किलोत नाय तर ग्रॅममध्ये विकला जातोय चिकन-65!!! कळलं का? पण, हे चिकनच्या पुढं 65 नंबर का लावल्यात माहितीय का? नाही ना? चल आपण दोघंबी समजून घेऊ…

पहिली स्टोरी : या चिकन-65 (Chicken 65) नावाबद्दल लई स्टोऱ्या सांगितल्या जातात. आपण एक-एक करून समजून घेऊ या… तर पहिली स्टोरी अशीय की, चैन्नईमध्ये बुहारी नावाचं फेमस हाॅटेल होतं. त्यामध्ये येणारं रोजचं गिऱ्हाईक इडली, डोसा, उताप्पा खाऊन खाऊन वैतागलं होतं. गिऱ्हाईकला बदल पाहिजे होता.

हाॅटेल मालकाला एक शक्कल सुचली. त्यानं गिऱ्हाईकाला वेगळं काहीतर द्यायचं म्हणून खुसखुशीत गरमागरम चिकन तळून दिलं. ती गिऱ्हाईकाला लई आवडली. पण, या पदार्थाच नाव काय द्यायचं, हा प्रश्न पडला. आता ही घटना 1965 ची घडली होती. आता या पदार्थाला नाव काय द्यायचं म्हणून त्या वर्षाच्या आकड्यावरून चिकन-65 हे नाव देऊन टाकलं. पण, ही कथा कितपत खरी हाय, याचाच पत्ता नाय लागतं.

दुसरी स्टोरी : ही स्टोरी तर लई भन्नाट हाय… असं सांगत्यात की, चिकन-65 लोणच्यासारखं पदार्थ होता. चिकनचं तुकडं करायचं आणि त्याला 65 दिवस आंबवत ठेवायचं. म्हणून या पदार्थाचं नाव चिकन-65 ठेवलंय. पण, ही स्टोरी आपल्या बुद्धीला पटत नाय राव. कारण, आताचा चिकन-65 मुरलेला दिला जात नाय, तर फ्राय करून दिला जातो.

तिसरी स्टोरी : चैन्नईतल्या एका माणसानं गिऱ्हाईकांना चॅलेंज दिलं. तो म्हणला, "लईत लई मिरच्या टाकून मी चिकनची डीश तयार करणार हाय. तुम्ही खाऊन दाखवा. या पठ्ठ्यानं लई मिरच्या म्हंजी १ किलो चिकनला मोचून 65 मिरच्या टाकल्या. गिऱ्हाईकांनी तेवढ्या मिरच्यासकट ते चिकन संपविलं. लोकांना हा नवा पदार्थ लई आवडला. पुढं ही नवी डिश फेसम झाला. ६५ मिरच्या होत्या म्हणून या पदार्थाचं नाव पडलं चिकन-65!

चौथी स्टोरी : ब्रिटीशांच्या काळात म्हणं… आता कशा अधिकाऱ्यांचा बदल्या होत्यात ना तशा बदल्या व्हायच्या. दक्षिणेतील अधिकारी उत्तरेत जायचा आणि उत्तरेला अधिकारी दक्षिणेत जायचा. मग, उत्तरेचा अधिकारी साऊथ इंडियात गेला की, तिथल्या पदार्थांची अवघड नावं त्याला घ्यायला यायची नायत. मग, त्याच्या सोईसाठी आणि त्याला आवडेल अशी डिश तयार करण्यात आली. त्या डिशचं नाव सोपं असावं आणि इंग्लिशमध्ये घेता यावं म्हणून या नव्या डिशला चिकन-65 हे नावं दिलं. इतकंच नाय, तर ही डिश मेनूकार्डमधील 65 नंबरला ठेवण्यात आली. म्हणून चिकन-65 हे नाव फेसम झालं.

कशी काय वाटली चिकन-65 स्टोरी? आता कोल्हापुरात जावा, सांगलीत जावा, नाही तर पुण्यामुंबईत जावा… चिकन-65 खाताना त्याच्या नावाची स्टोरी तुम्हाला माहिती असणार आणि तुम्हीबी खाणाऱ्याला सांगणार… व्हय की नाय?

पाहा व्हिडीओ : आठ दिवस टिकणाऱ्या मटण लोणच्याची रेसिपी…

या रेसिपी वाचल्या का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news