Lok Sabha Elections 2024| मतदानपूर्व सर्वेक्षण : ‘एनडीए’ची झेप कायम; ५६ टक्के मतदारांचा नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर विश्वास | पुढारी

Lok Sabha Elections 2024| मतदानपूर्व सर्वेक्षण : 'एनडीए'ची झेप कायम; ५६ टक्के मतदारांचा नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर विश्वास

सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची कामगिरी पं. जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. ‘पुढारी-सीएसडीएस-लोकनीती’च्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचा निष्कर्ष प्रत्यक्षात आला, तर नरेंद्र मोदी हे नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणारे नेते ठरतील. जनमताच्या पाहणीत चिंतेचे मुद्दे असतानाही जमेची बाजूही असल्याने मोदी यांना अॅडव्हांटेज दिसते आहे.

मोदींना सबका साथ, मोदींवर सबका विश्वास

भाजपप्रणीत मोदी सरकारची कामगिरी हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा ठरणार आहे. एकीकडे केंद्र सरकारतर्फे गेल्या दहा वर्षांत राबविलेली धोरणे लोकांपुढे घेऊन जाण्यास भाजप उत्सुक आहे; तर दुसरीकडे सामाजिक अस्वस्थता, आर्थिक अडचणी आणि राजकीय चिंता या मुद्द्यांच्या आधारे विरोधक सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊ पाहत आहेत. ‘पुढारी-सीएसडीएस-लोकनीती’च्या मतदानपूर्व सर्वेक्षणातून  पुढील मुद्दे समोर येतात… (Lok Sabha Elections 2024)

केंद्राच्या कामगिरीवर मतदार समाधानी

५७ टक्क्यांहून अधिक मतदार मोदींबद्दल पूर्णपणे किंवा अंशतः समाधानी आहेत. २०१९ मध्ये ही टक्केवारी ६५ होती. सरकारविरोधातील असंतोषाची पातळी किंचित वाढल्याचे हे निदर्शक आहे.

सर्व आर्थिक स्तरांतील मतदार अनुकूल

आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आणि संपन्न वर्गात मोदी सरकारबद्दलची अनुकूलता ६२ टक्के इतकी असून, ५७ टक्के मध्यमवर्गीय मोदी सरकारवर खूश आहेत. निम्न आर्थिक स्तरातील ५६ टक्के, गरीब वर्गातील ५५ टक्क मतदार मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत.

ग्रामीण भारत मोदींच्या पाठीशी

गावपातळीवरील मोदी सरकारची स्वीकारार्हता सर्वाधिक आहे. गावांमध्ये राहणारे ६० टक्के मतदार मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. निमशहरी भागात ही टक्केवारी ५१ टक्के; तर शहरी भागात ४९ टक्के इतकी आहे.

विविध सामाजिक स्तरांतून मोदींना पसंती

देशातील आठ टक्के मुस्लिम मोदी सरकारवर पूर्ण समाधानी, तर २४ टक्के मुस्लिम अंशतः समाधानी आहेत. ६८ टक्के हिंदू उच्चवर्णीय मोदी सरकारवर समाधानी आहेत. ६३ टक्के हिंदू ओबीसी मोदी सरकारवर खूश आहेत. ५७ टक्के हिंदू एससी आणि ५८ टक्के हिंदू एसटी मोदी सरकारबाबत समाधानी आहेत.

मोदींची लोकप्रियता राहुल गांधींच्या दुप्पट

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच केंद्रस्थानी आहेत, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी स्पर्धक नेत्यांपेक्षा प्रचंड पुढे असल्याचे ‘पुढारी-सीएसडीएस- लोकनीती’च्या मतदानपूर्व चाचणीतून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानपदी कोण असावे, या प्रश्नावर जवळपास निम्म्या मतदारांनी (४८ टक्के) एकमुखाने नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. २७ टक्क्यांसह राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर असले, तरी मोदी आणि त्यांच्या लोकप्रियतेत जवळपास दुपटीचा फरक आढळून येतो. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव ही अन्य काही नावे मतदारांनी घेतली; पण त्यांची लोकप्रियता दोन आकडी टक्केवारीही गाठू शकलेली नाही. पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला दखलपात्र पसंती नाही.

दक्षिण भारतासह पूर्वोत्तर राज्यांत भाजपला लाभ

आज मतदान झाले, तर उत्तर आणि पश्चिम भारतात एनडीएला ५० टक्के मतदारांचा पाठिंबा मिळेल. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या दक्षिण भारतातील मतांमध्ये ७ टक्क्यांची; तर पूर्व आणि ईशान्य भारतातील मतांमध्ये ८ टक्क्यांची लक्षणीय वाढ होईल, असे सर्वेक्षणातून समोर येते आहे.

मोदीच ठरताहेत हुकमाचा एक्का

केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार, ही भावना प्रबळ असल्याचे अनुमान ‘पुढारी-सीएसडीएस-लोकनीती’च्या पाहणीतून काढता येते. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी या नावावर भारतीय जनता पक्षाने मते मागितली; २०१९ मध्येही मोदी कार्डच वापरले गेले आणि आज २०२४ च्या होत असलेल्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी हाच भाजपसाठी आणि ‘एनडीए’च्या उमेदवारांना जिंकण्यासाठी हुकमाचा एक्का आहे.
सलग तिसऱ्या टर्मसाठी मतदारांना सामोरे जाताना प्रस्थापित विरोधी जनभावनेचा सामना निश्चितपणे करावा लागतो. परंतु, नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत ही भावना अद्याप टोकदार झालेली नाही, असाही निष्कर्ष या पाहणीतून काढता येतो. राम मंदिरासारखा व्यापक समाजाच्या भावनेला हात घालणारा विषय न्यायालयाच्या मार्गाने सुटला आणि प्रत्यक्षात राम मंदिर उभेही राहिले. याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसतो आहे.

या सरकारच्या काळात पायाभूत सुविधांचा विकास झाला, जगात भारताची प्रतिमा उंचावली, दारिद्र्यनिर्मूलनासाठी प्रयत्न झाले, आर्थिक विकासाला गती आली, अशा विविध मुद्द्यांवर जनतेच्या मनात मोदी सरकारविषयी सकारात्मक भावना आहेत. याचे प्रमाण किती आहे, यापेक्षा वरील प्रत्येक मुद्दा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा वादा हा ‘अच्छे दिन’चा होता आणि हा वादा पूर्ण करण्याच्या दिशेने समाधानकारक प्रगती झालेली आहे, असा मानणारा वर्गही मोठा आहे. सरकार आपली वचनबद्धता पाळते आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, हा विश्वास देण्यात मोदी सरकारला यश आल्याचेही ही पाहणी सांगते. दलित आणि आदिवासी हे दोन घटक वगळता ओबीसी, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील लोकप्रियता टिकवून धरण्यात मोदींना यश आलेले आहे, हाच घटक त्यांच्या तिसऱ्या टर्मसाठी निर्णायक भूमिका बजावेल, असे मानायला निश्चित वाव आहे. (Lok Sabha Elections 2024)

मतदानाला तीन आठवडे ते काही ठिकाणी दोन महिने इतका कालावधी असताना हे सर्वेक्षण झाले आहे, त्यामुळे मतदारांना जाणीवपूर्वक विचारण्यात आले की, तुमचे आजचे मत अंतिम असेल याची शक्यता कितपत आहे? त्यावेळी तीनपैकी एका मतदाराने सांगितले की, प्रत्यक्ष मतदान करताना आमचा निर्णय बदलू शकतो. सर्व पक्षांच्या मतदारांसाठी हे लागू आहे.

हेही वाचा : 

Back to top button