पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' राबवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka Chief Minister Siddaramaiah) यांनी केला आहे. भाजपने सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही दावाही त्यांनी केला आहे. इंडिया टुडे टीव्हीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी हा दावा केला आहे. (Operation Lotus in Karnataka)
कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुकीत मोठा जुना पक्ष हरल्यास त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. सिद्धरामय्या यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले, "भाजप एक वर्षापासून कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले," असे सिद्धरामय्या यांनी पुढे सांगितले.
"त्यांना काँग्रेस फोडणे शक्य होणार नाही. आमचा एकही आमदार पक्ष सोडणार नाहीत," असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजप खासदार एस प्रकाश यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. "हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते केवळ समाजातील एका वर्गाची सहानुभूती मिळवण्यासाठी वारंवार असे आरोप करत आहे, जे त्यांना पाठिंबा देत आहेत," असे भाजप खासदार एस. प्रकाश यांनी India Today TV शी बोलताना म्हटले आहे.
मुख्य मुद्द्यांकडे लक्ष देण्याऐवजी आणि कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुख्यमंत्री "फेक" आरोप करत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. "लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सिद्धरामय्या निवडणुकीनंतर त्यांचे सरकार कसे टिकेल? याकडे लक्ष केंद्रित करत आहेत," असा आरोप भाजप खासदार एस. प्रकाश यांनी केला. (Operation Lotus in Karnataka)
हे ही वाचा :