लेक अन् सुनेत फरक केला, वाद पेटला! मूळ पवार, बाहेरचे पवार… शरद पवार यांच्या टिपणीमुळे महिला नेत्यांनी घेरले | पुढारी

लेक अन् सुनेत फरक केला, वाद पेटला! मूळ पवार, बाहेरचे पवार... शरद पवार यांच्या टिपणीमुळे महिला नेत्यांनी घेरले

कोल्हापूर न्यूज डेस्क : राज्याचं राजकारण ज्या पवार नावाभोवती फिरतं, त्यावरून सध्या मोठाच वाद पेटला आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार अशी टिप्पणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता केली अन् लेक अन् सुनेत केलेल्या फरकावरून शुक्रवारी दिवसभर त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. अजित पवारांच्या लग्नाला 39 वर्षे झाली तरीही सून बाहेरची कशी, असा प्रश्न शरद पवारांना महिला नेत्यांनी केला आहे.

असा पेटला वाद

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत म्हणाले होते की, तुम्ही मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. त्यानंतर साहेबांना मतदान केलं, नंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना मतदान केलं. आता सुनेला मतदान करा. म्हणजे पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल. मी सांगतो पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा. शरद पवारांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर आपल्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले की, पवार आडनावाला मतं द्या. यात चुकीचं काय?

महिला नेत्यांनी घेरले…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, शरद पवार यांना नेमकं काय म्हणायचं आहे? एखादी सून 30 वर्षे, 40 वर्षे, 50 वर्षे जरी लग्न होऊन झाले असतील तरीही ती बाहेरची असते का? ती घरची होत नाही. त्यांचं हे बोलणं मला मुळीच पटलं नाही.

भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ म्हणाल्या की, आतापर्यंत मुलगा आणि मुलगीमध्ये भेद न करणार्‍या शरद पवारांनी मुलगी आणि सूनेमध्ये फरक केला, हे दुर्दैवी आहे. 40 वर्षे पवारांच्या घरात नांदणारी मराठवाड्यातील पाटलांची लेक त्यांना आपली वाटत नाही, परकी वाटते. यापेक्षा दुर्दैव ते काय? राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झालेत हे खेदानं म्हणावं लागतं. जी सून तुमच्या घरात आली, कुटुंबात आली. तुमचे कूळ वाढवलं, तिला मानसन्मान देण्याची वेळ येते तेव्हा दुधातल्या माशीप्रमाणे बाहेर काढण्याचं शरद पवारांचं विधान होतं. त्यांच्या विधानामुळे राज्यातील सर्वच सुना दुखावल्या आहेत.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही तुमचे विचार बदलले. बारामतीच्या काकांचं हे वाक्य महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करून सासरी गेलेल्या सुनांचा अपमान करणारे आहे.

कोण आहेत सूनबाई?

सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिवच्या तेर गावच्या आहेत. त्या मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. पद्मसिंह पाटलांच्या त्या बहीण आहेत. सुनेत्रा पवार यांचं वडिलांकडील नाव सुनेत्रा बाजीराव पाटील असे आहे.

Back to top button