Liquor Policy Case | बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी | पुढारी

Liquor Policy Case | बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मद्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. के. कविता यांना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Liquor Policy Case)

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याची संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी (दि. ११ एप्रिल) अटक केली होती. त्यानंतर आज (दि.१२) त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने के. कविता यांच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. पण सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने के. कविता यांना ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, के कविता यांच्या वकिलाने सीबीआयने केलेली त्यांची अटक “बेकायदेशीर” असल्याचा दावा केला. तसेच त्यांनी तपास यंत्रणेवर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. काही तासांनतर दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिले. त्यामुळे के कविता यांचा १५ एप्रिलपर्यंतचा मुक्काम आता सीबीआय कोठडीत असणार आहे. आता के. कविता यांना सीबीआय मुख्यालयात नेऊन तिथे त्यांची चौकशी केली जाईल. यापूर्वी सीबीआयने ६ एप्रिल रोजी तिहारमध्ये कविता यांची चौकशी केली होती. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कविता २६ मार्चपासून न्यायालयीन कोठडीत होत्या.

तर सीबीआयने के. कविता यांची कोठडीत चौकशीची मागणी करताना सांगितले की त्यांनी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आम आदमी पक्षाला (AAP) लाच देण्याबाबतच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर दिलेले नाहीत.

मद्य व्यावसायिकाने घेतली होती केजरीवालांची भेट

दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी दरम्यान सीबीआयने असा युक्तिवाद केला आहे की दक्षिणेतील एका मद्य व्यावसायिकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी सदर व्यवसायिकाने दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला आणि त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांना के. कविता त्यांच्याशी संपर्क करतील असे सांगितले होते. आमच्याकडे याबाबतचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि संबंधित आरोपींचे जबाब आहेत, असेदेखील सीबीआयने म्हटले आहे. (K Kavitha)

बीआरएस नेत्या के. कविता त्यांच्या माहितीत असलेली तथ्ये लपवत आहेत. तपासात सहकार्य करत नाहीत असा आरोपदेखील सीबीआयने त्यांच्यावर केला. यापूर्वी नोटीस देऊनही त्या अनेकवेळा तपासास हजर झाल्या नाहीत. सीबीआयच्या सरकारी वकिलांना त्यांची चौकशी करायची आहे, त्यामुळे के. कविता यांची ५ दिवसांची कोठडी हवी आहे, अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयाकडे केली.

हे ही वाचा :

 

Back to top button