'आप'च्‍या भ्रष्‍टाचारावर 'बाेट' ठेवत मंत्री राजकुमार यांनी दिला राजीनामा | पुढारी

'आप'च्‍या भ्रष्‍टाचारावर 'बाेट' ठेवत मंत्री राजकुमार यांनी दिला राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज कुमार आनंद यांनी आज (दि.१० एप्रिल) आम आदमी पार्टीच्या ( आप) प्राथमिक सदस्यत्वासह मंत्री पदाचा राजीनामा दिला. पक्षाने भ्रष्टाचाराबाबतच्या घेतलेल्‍या धोरणावरुन त्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनामा देताच त्‍यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खिल्लीउडवली.

दिल्‍ली मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. राजकुमार आनंद हे पटेल नगर भागातील आमदार आहेत. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली मंत्रिमंडळात ते समाजकल्याण मंत्री होते.

‘आप’ भ्रष्‍टाचाराच्‍या दलदलीत अडकलेला पक्ष

आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच आनंद यांनी सांगितले की, “आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी झाला होता; पण आज पक्ष भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. मला मंत्रीपदावर काम करणे कठीण झाले आहे. मी काम करू शकत नाही म्हणून मी मंत्रीपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला.”

राजकारण बदलले नाही राजकारणी बदलले

राजकुमार आनंद यांनी सांगितले की, जंतर-मंतरवरून अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, राजकारण बदलले की देश बदलेल. राजकारण बदलले नाही, तर राजकारणी बदलले आहेत. आम आदमी पार्टीमध्‍ये दलितांना पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचा आरोपही त्‍यांनी केला. ‘आप’च्या दलित आमदार, मंत्री किंवा नगरसेवकांना कोणताही सन्मान दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button