प. बंगाल पोलिसांचे NIA अधिकार्‍यांना समन्‍स, गुन्‍हा रद्दसाठी ‘NIA’ची उच्‍च न्‍यायालयात धाव

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या (एनआयए) पथकावर झालेल्‍या हल्‍ला प्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी आज (दि.९एप्रिल) 'एनआयए'च्या दोन अधिकाऱ्यांना समन्स बजावले. तर 'एनआयए'ने बंगाल पोलिसांच्या एफआयआरविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  ( West Bengal Police Summoned Two NIA Officers In Attacked Case Bhupatinagar )

जखमी NIA अधिकार्‍यांना वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्‍याचे आदेश

पश्‍चिम बंगाल पोलिसांनी समन्समध्ये हल्ल्याची तक्रार करणारे अधिकारी आणि हल्ल्यात जखमी झालेल्या एका अधिकाऱ्यालाही समन्स बजावले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या अधिकाऱ्याला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले आहे. जखमी अधिकाऱ्याला त्याची वैद्यकीय कागदपत्रे आणण्यास सांगितले आहे. पोलिसांनी 'एनआयए' अधिकाऱ्यांना हल्ल्यात नुकसान झालेली कार आणण्यास सांगितले आहे. पोलिस कारची फॉरेन्सिक तपासणी करणार आहेत.

बंगाल पोलिसांचे हल्ला प्रकरणातील ग्रामस्‍थांनाही समन्स

एनआयए पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भूपतीनगर पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी तीन ग्रामस्‍थांना चौकशीसाठी बोलावले आहे. गावकऱ्यांना येत्या दोन ते तीन दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर NIA अधिकाऱ्यांना 11 एप्रिलला पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

'एनआयए'ने उच्च न्यायालयात धाव

बंगाल पोलिसांनी दाखल केलेला गुन्‍हा रद्द करण्यासाठी एनआयएने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एनआयएने मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. एनआयएने बंगाल पोलिसांच्या कोणत्याही कारवाईपासून संरक्षणाचे आवाहनही केले आहे.

काय आहे प्रकरण ?

2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी NAIचे पथक पूर्व मिदनापूरमधील भूपतीनगर भागात गेले होते. हे पथक आरोपींना अटक करून कोलकाता येथे आणत होते. यावेळी ग्रामस्थांनी एनआयए पथकाच्या ताफ्याला घेराव घातला आणि दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक अधिकारी जखमी झाले. यावर स्‍थानिकांवर गुन्‍हा दाखल झाला आहे. ममता बॅनर्जींच्या राजवटीत पश्‍चिम बंगालमध्‍ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून हे सर्व पोलिसांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते जाना यांच्या पत्नी मोनोब्रता जाना यांच्या तक्रारीवरून एनआयए टीम आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. NIA अधिकाऱ्यांनी घरात घुसून त्यांना मारहाण केली. अधिकाऱ्यांनी आपल्या सन्मानाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी भूपतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२५, ३४, ३५४, ३५४ (बी), ४२७, ४४८, ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जी यांनी केली होती स्‍थानिकांची पाठराखण

राष्‍ट्रीय तपास संस्‍थेचे (NIA) पथक मेदिनीपूरमध्‍ये मध्यरात्रीनंतर छापा टाकण्यासाठी का आले?, विचित्र वेळेत छापे टाकण्यासाठी पथकाला आवश्यक परवानगी होती का, असे सवाल करत स्थानिक लोकांनी मध्‍यरात्री गावात अनोळखी व्यक्ती आल्यावर जे करायला हवे होते तेच केले, अशा शब्‍दांमध्‍ये पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी NIA पथकावर हल्‍ला करणार्‍या स्‍थानिकांची पाठराखण केली होती.

यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा संदर्भ देत ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, "निवडणुकीच्या आधी ते लोकांना का अटक करत आहेत? भाजपला वाटते की, ते प्रत्येक बूथ एजंटला अटक करतील? 'एनआयए'कडे काय अधिकार आहेत? हे सर्व भाजपला पाठिंबा देण्यासाठी केले जात आहे. भाजपच्या या घाणेरड्या राजकारणाविरुद्ध आम्‍ही लढा देत आहोत, असेही ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या होत्‍या.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news