Lok sabha election 2024 : प्रियंका गांधी लोकसभेत पदार्पण करणार? ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढविणार? | पुढारी

Lok sabha election 2024 : प्रियंका गांधी लोकसभेत पदार्पण करणार? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढविणार?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघात सोनिया गांधी यांच्‍यानंतर कोण?, या प्रश्‍नावर काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींनी उत्तर शोधले आहे. या मतदारसंघातून प्रियंका गांधी-वढेरा निवडणूक लढवतील, असे संकेत रायबरेली जिल्‍हा काँग्रेस कार्यकारिणीना मिळाले आहेत. त्‍यामुळे मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्‍साहाचे वातावरण आहे.

यंदा सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत, अशी घोषणा झाली. यानंतर जिल्‍हा कार्यकारणीच्‍या पदाधिकार्‍यांनी १० फेब्रुवारीला प्रियंका गांधी यांच्‍या नावाचा आग्रह धरला. प्रियंका गांधी यांनी आपला राजकीय प्रवास रायबरेलीतून सुरू केला तर राज्याच्या प्रत्येक लोकसभा जागेवर एक मोठा संदेश जाईल, ज्याचा फायदा इंडिया आघाडीला होईल, असेही मानले जात आहे.

रायबरेलीत प्रियंका गांधी यांची मोठी लोकप्रियता

आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यासारखी रायबरेलीत प्रियंका गांधी यांची माेठी लोकप्रियता आहे. १९९९ मध्‍ये त्‍यांनी या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन सतीश शर्मा यांचा प्रचार केला होता. यानंतर २००४मध्‍ये सोनिया गांधी यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेव्‍हाही प्रियंका यांनी स्वतः प्रचाराचे व्यवस्थापन केले होते. त्‍यांना या मतदारसंघाची चांगली राजकीय जाण आहे. २०२६ मध्‍ये रायबरेली जिल्हा पंचायत निवडणुकीतही प्रियंका गांधी यांच्या रणनीतीमुळे काँग्रेसने जिल्हा पंचायत अध्यक्षपद काबीज केले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही प्रियंका गांधी यांनी सदर आणि हरचंदपूर येथे सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाल्‍याचे पक्षाचे पदाधिकारी मानतात.

प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवतील, असा रायबरेली जिल्हा काँग्रेस कमिटीला विश्वास आहे. फेब्रुवारीमध्ये एक शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. तिथे जिल्ह्याचा राजकीय सर्वेक्षण अहवाल सादर करण्‍यात आला होता. यामध्‍ये प्रियंका गांधी यांना निवडणूक लढवावी, असे नमूद करण्‍यात आले होते.

हेही वाचा : 

Back to top button