Lok Sabha Election 2024 : समोसा-चहा प्रत्‍येकी १०रु; निवडणूक आयोगाने प्रचारासाठी ठरवले दरपत्रक | पुढारी

Lok Sabha Election 2024 : समोसा-चहा प्रत्‍येकी १०रु; निवडणूक आयोगाने प्रचारासाठी ठरवले दरपत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : समोसा आणि चहा प्रत्‍येकी १० रुपये, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स प्रत्येकी 15 रुपये, शाकाहारी थाळी100 रुपये आणि मांसाहारी थाळीसाठी 180 रुपये, हाच दर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी असावा, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना स्‍पष्‍ट केले आहे.

यासंदर्भात ‘टाईम्‍स ऑफ इंडिया’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने प्रचार साधनांच्‍या वस्तूंच्या यादीमध्ये मायक्रोफोन, लाऊडस्पीकर,वाहने, बॅनर, खुर्च्या आणि इतर उपकरणांच्‍या भाडे शुल्काचा समावेश केला आहे. त्‍याचबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, नाश्ता आणि स्नॅक्ससाठी वेगवेगळे दर आहेत. बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्यांची किंमत त्यांच्या कमाल किरकोळ किमतीनुसार (MRP) आहे. कचोरी 15 रुपये, सँडविच 25 रुपये आणि जिलेबी 90 रुपये किलो हाच दर असावा, असेही आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे.

वाहनांचे प्रतिदिन भाडेदर ‍निश्चित

वाहनांचे प्रतिदिन भाडेदर ‍निश्चित करण्यात आले आहे. दुचाकीसाठी  300 रु, ई-रिक्षा 600 रु, टाटा सफारी आणि होंडा सिटी सारख्या SUV   3,000 रुपये, टोयोटा इनोव्हा, टोयोटा फॉर्च्युनर आणि मित्सुबिशी पाजेरो सारख्या मोठ्या SUV प्रति दिन 3,200 रुपये आहे. ऑटो रिक्षासाठी दररोज 850 रुपये आणि लाऊडस्पीकर असलेल्या ऑटोसाठी 1,350 रुपये प्रतिदिन हाच दर असावा, असेही निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे.

200 प्रचार वस्तूंची यादी तयार करण्यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत

निवडणूक आयोगाने 200 प्रचार वस्तूंची यादी तयार करण्यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत केली, ज्यात अन्न सुरक्षा विभागाचे खाद्य दर आणि संबंधित विभागांचे इतर दरांचा समावेश आहे. कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी उमेदवारांनी निवडणूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खर्च मर्यादांचे पालन केले आहे. याची खात्री करण्यासाठी विभाग कार्यक्रमांची नोंद करण्यासाठी आणि खर्चाचे विश्लेषण करण्यासाठी टीम पाठवली जाते. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या एसएमएस आणि व्हॉईस कॉल मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या मोहिमांसाठी देखरेख समितीकडून पूर्व मंजुरी आवश्यक आहे. निवडणूक खर्च मर्यादा ओलांडू नये यासाठी आयोग या मोहिमेवरील खर्च शोधण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांसोबतही काम करत आहे.

 

Back to top button