Lok Sabha election 2024 : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे मुसंडी मारणार का? | पुढारी

Lok Sabha election 2024 : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे मुसंडी मारणार का?

दादर शिवाजी पार्कपासून सुरू होऊन, थेट पूर्व उपनगरातील मानखुर्दपर्यंत जाणार्‍या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या हद्दीमध्ये झालेल्या बदलानंतर या मतदार संघात शिवसेनेचे म्हणजेच ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे. 2009 मध्ये या मतदार संघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुरेश गंभीर यांचा सुमारे 75 हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवामुळे या मतदार संघात शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. स्वतः उद्धव ठाकरेही या मतदार संघावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगरसेवक असलेले राहुल शेवाळे 1 लाख 38 हजार मताधिक्याने निवडून आले. एक नगरसेवक असतानाही केवळ ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे एकनाथ गायकवाड यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतही शेवाळे यांनी दुसर्‍यांदा विजय मिळवला. यावेळी मताधिक्य 1 लाख 52 हजार इतके होते. विशेष म्हणजे यावेळी गायकवाड निवडणूक रिंगणात होते. मात्र, आता शिवसेनेची फाळणी झाल्यामुळे या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

या मतदार संघातून शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. शेवाळे यांनी अनेकदा ठाकरे यांच्याविरोधात अप्रत्यक्ष व प्रत्यक्षरीत्या मोहीम उघडली होती. त्यामुळे ठाकरे सेनेचे शिवसैनिक शेवाळे यांच्यावर नाराज आहेत. त्यात शेवाळे यांचे एका महिलेच्या प्रकरणात नाव गुंतल्यामुळे त्यांची मोठी बदनामी झाली होती.

दरम्यान, शिवसेना एकत्र असती तरी शिवसैनिकांची नाराजी व महिला प्रकरणावरून शेवाळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेवाळे यांना या मतदार संघातून हॅट्ट्रिक साधने आता सहज शक्य राहिलेले नाही. हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्यामुळे येथून शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाने माजी खासदार अनिल देसाई यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी ती लवकरच होण्याची शक्यता आहे. देसाई या मतदार संघात नवीन असले तरी ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे त्यांना या निवडणुकीत शेवाळे यांच्याशी लढत देण्यात अडचण भासणार नाही. त्यामुळे या मतदार संघात दोन ज्येष्ठ शिवसैनिकांमध्येच लढाई बघायला मिळणार आहे.

ठाकरे गटालाही निवडणूक सोपी नाही!

हा लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला असला, तरी माहीम मतदार संघातील ठाकरे गटाचे आमदार सदा सरवणकर शिंदे गटात आहेत. त्याशिवाय अणुशक्तीनगरचे ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम कातेही शिंदे गटातच आहेत. त्यामुळे या दोन विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाला 100 टक्के मते मिळतील, याची खात्री नाही. एवढेच नाही तर वडाळा व सायन हे दोन विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. तर अणुशक्तीनगर या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आमदार आहेत. सध्या मलिक अजित पवार गटात आहेत. केवळ धारावी व चेम्बूर या दोन विधानसभेत अनुक्रमे ठाकरे गट व काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभेची तुलना केल्यास चार विधानसभा महायुतीच्या ताब्यात आहेत. तर दोन विधानसभा महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे ठाकरे गटालाही निवडणूक जिंकणे तितकेसे सोपे नाही.

मनसेची मते निर्णयक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे मनसे महायुतीसोबत येईल, असे म्हटले जात आहे. या मतदार संघात मनसेचा शिवाजी पार्क, दादर, माहीम आदी भागात बर्‍यापैकी जोर आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदार संघातून मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा अवघ्या 5 हजार 900 मतांनी पराभव झाला होता. तर 2019 मध्ये 18 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे मनसेची मते निर्णयक ठरू शकतात.

लोकसभा कार्यक्षेत्रातील आमदार

वडाळा : कालिदास कोळंबकर (भाजप)
सायन कोळीवाडा : आर. तमिल सेल्वन ( भाजप)
अणुशक्तीनगर : नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
चेम्बूर : प्रकाश फातर्पेकर (शिवसेना ठाकरे गट)
धारावी : वर्षा गायकवाड (काँग्रेस)
माहीम : सदा सरवणकर
(शिवसेना शिंदे गट)

शेवाळे यांची वैयक्तिक मते तारू शकतात!

सलग दहा वर्षे खासदार असल्यामुळे राहुल शेवाळे यांची वैयक्तिक व शिंदे गटाला मानणार्‍या शिवसेनेची काही मते शेवाळे यांना तारू शकतात. शेवाळे यांचे चेम्बूर, अणुशक्तीनगर व धारावीतील काही भागात काही प्रमाणात वर्चस्व आहे.

भाजपची 100 टक्के मते मिळाल्यास चमत्कार!

या लोकसभा मतदार संघांमध्ये भाजपचे दोन आमदार असल्यामुळे युतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपची काही मते शेवाळे यांच्या पारड्यात पडू शकतात. जर शेवाळे यांना भाजपची 100 टक्के मते मिळाली, तर चमत्कार घडू शकतो.

हेही वाचा : 

Back to top button