६.९६ लाखांनी पार, तर अवघ्या नऊ मतांनी हार | पुढारी

६.९६ लाखांनी पार, तर अवघ्या नऊ मतांनी हार

मूळचे जळगावचे, पण नंतर गुजरातमध्ये स्थायिक झालेले सी. आर. पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर गेल्या लोकसभा निवडणुकीत नवसारी मतदार संघात विक्रमी म्हणजे तब्बल 6.89 लाख मतांनी विजयाला गवसणी घातली. मात्र, 2014 मधील पोटनिवडणुकीत महाराष्ट्रातील बीड मतदार संघात डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रस्थापित केलेल्या 6.96 लाख मताधिक्क्याचा विक्रम ते मोडू शकले नाहीत.

तेव्हाचे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे बीडमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पाठोपाठ भाजपच्या सुभाष बहेरिया यांनी भिलवाडा मतदार संघातून 6.12 लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. पश्चिम दिल्लीतून परवेश वर्मा यांनी 5.78 लाखांनी, तर उत्तर-पश्चिम दिल्लीतून हंसराज हंस यांनी 5.53 लाखांच्या मताधिक्क्याने प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारली. गांधीनगर मतदार संघातून विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 5.55 लाख मताधिक्क्याने प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली होती. केरळमधील वायनाड मतदार संघातून राहुल गांधी यांनीही 4.31 लाख मतांनी दणदणीत विजय गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळविला होता.

1977 मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे शंकरराव माने विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे दाजिबा देसाई अशी लढत होती. रात्रभर मतमोजणी होऊन दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता निकाल जाहीर झाला तेव्हा दाजिबा देसाई यांनी शंकरराव माने यांचा अवघ्या 165 मतांनी पराभव केला. त्या निकालाची तेव्हा दीर्घकाळ चर्चा झाली होती. उत्तर प्रदेशातील मछलीनगर मतदार संघात 2019 साली भाजपचे भोलानाथ यांनी बसपचे उमेदवार त्रिभुवन राम यांचा केवळ 181 मतांनी पराभव केला.

आंध्र प्रदेशातील अनाकपल्ली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे के. रामकृष्ण यांनी 1989 मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारावर अवघ्या नऊ मतांनी विजय मिळवला होता. बिहारात 1998 मध्ये सोम मरांडी यांनीही नऊ मतांनी विजय मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवाराला आश्चर्याचा धक्का दिला होता. 1996 मध्ये गुजरातच्या बडोदा मतदार संघात सत्यजित सिंह गायकवाड यांनी 17 मतांनी, तर 1971 मध्ये तामिळनाडूतील तिरुचेंदूर मतदार संघात सिवस्वामी फक्त 26 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला नमविले होते.

हेही वाचा : 

Back to top button