नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अटक नाट्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आज (दि.२२) एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करताना केजरीवाल यांना पाठिंबा दिला. तसेच केंद्र सरकारच्या आदेशानुसार सक्तवसुली संचलनालयाने सूडबुद्धीची कारवाई केली आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली.
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, माजी खासदार व वरिष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओ'ब्रायन आणि मोहम्मद नदीमुल हक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, आम आदमी पक्षाचे संदीप पाठक आणि पंकज गुप्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) तर्फे जितेंद्र आव्हाड आणि समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली यांच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन सत्ताधाऱ्यांविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराची तक्रार केली.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर अभिषेक सिंघवी यांनीच राऊज एव्हेन्यू न्यायालयामध्ये केजरीवाल यांची बाजू मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाशी झालेल्या भेटीनंतर अभिषेक सिंघवी यांनी माध्यमांशी बोलताना गुरूवारी (दि.२१) रात्री ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला. हा मुद्दा संविधानाशी संबंधित असल्याचे सांगताना ते म्हणाले, की सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतो तेव्हा संविधान आणि लोकशाहीवर हल्ला होतो. यापूर्वीही केंद्रात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार होते. परंतु सरकारने तपास यंत्रणांचा एवढा गैरवापर निवडणुकीत केला नव्हता, अशी संतप्त टिकाही सिंघवी यांनी केली. निवडणूक होण्याआधीच आपण जिंकावे, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे काय? असा उपरोधिक सवाल करताना सिंघवी यांनी निवडणूक आयोग केवळ शोभेची संस्था राहू नये, यासाठी आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी केली.
हेही वाचा :