

पुढारी ऑनलाईन : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. दरम्यान, केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, या याचिकेवर आज शुक्रवारी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि बेला त्रिवेदी यांच्या विशेष पीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी उल्लेख करताना सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, "जर ही प्रक्रिया सुरू राहिली, तर पहिले मतदान होण्यापूर्वी बरेच ज्येष्ठ नेते तुरुंगात जातील. कृपया याकडे लक्ष द्यावे." त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सिंघवी यांना सांगितले की, केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर होईल.
केजरीवाल यांनी गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मद्य धोरण घोटाळाप्रकरणी 'ईडी'ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 'आप'च्या अन्य नेत्यांना यापूर्वीच अटक केली आहे. 'ईडी'ने आतापर्यंत केजरीवाल यांना चौकशीसाठी ९ वेळा समन्स बजावले होते. त्यांनी 'ईडी'च्या नोटिसा आणि अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर 'ईडी'चे पथक रात्री दहावी नोटीस आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले.
अटकेपूर्वी केजरीवाल यांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती 'ईडी'च्या अधिकार्यांनी दिली. केजरीवाल चौकशीसाठी सहकार्य करीत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा :