Lok Sabha Election 2024 : तेलंगणात बीआरएसची जीवन-मरणाची लढाई | पुढारी

Lok Sabha Election 2024 : तेलंगणात बीआरएसची जीवन-मरणाची लढाई

रिहान (तेलगंणा)

आता लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी बहुतांश लोकसभा मतदार संघांत उमेदवार उभे करण्यासाठी बीआरएसची धडपड सुरू आहे. त्यातच राजकीय निरीक्षकांच्या मते सध्याच्या स्थितीत बीआरएसला जास्तीत जास्त दोन जागा मिळू शकतात. त्यामुळे बीआरएसच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

तेलंगणात विधानसभा निवडणुकांत दणकून पराभव पत्करावा लागल्यानंतर के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला सध्या खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांत या पक्षाला कितपत यश मिळेल, हे सांगणे आजच्या घडीला महाकठीण आहे. केसीआर कुटुंबाने चालवलेल्या बीआरएसचे मनोधैर्य खालावत चालले आहे. तशातच ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीनुसार बडे नेते पक्षाला रामराम ठोकून प्रामुख्याने भाजपमध्ये जाऊ लागले आहेत. यामुळे पक्षाला जोरदार धक्के बसू लागले आहेत.

मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात केसीआर यांची कन्या के. कविता यांना ‘ईडी’ने अटक केल्यामुळे तर बीआरएस सैरभैर झाला आहे. तेलंगणाला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळावा यासाठी 2001 मध्ये केसीआर यांनी स्थापन केलेल्या या पक्षातील समस्या त्यामुळे वाढत चालल्या आहेत. तेलंगणात लोकसभा सदस्यांची एकूण संख्या सतरा आहे. गेल्या निवडणुकीत बीआरएसने सर्वाधिक म्हणजे नऊ जागा जिंकल्या होत्या.

तिकिटासाठी सौदेबाजी

झहीराबादचे विद्यमान खासदार बी. बी. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःचे तिकीटही पक्के केले आहे. त्याचबरोबर खासदार रामुलू यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून मुलगा भरत प्रसाद याच्यासाठी तिकिटाची सौदेबाजी केली. पुढील काही आठवड्यांत पक्षांतरे आणखी वेगाने होतील, असे चित्र तेलंगणात दिसू लागले आहे. सध्या या राज्यात काँग्रेस सत्तेवर आहे. काँग्रेस सरकारने चेवेलाचे खासदार रंजीत रेड्डी यांच्यासह काही नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे,

तर काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. इतर अनेक जण त्यांचे दरवाजे ठोठावत आहेत. यात माजी मंत्री आणि श्रीमंत उद्योगपती सी. एच. मल्ला रेड्डी यांचाही समावेश आहे. बांधकाम आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे साम्राज्य उभारले आहे. मात्र, अनेक नियम तथा कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सध्या त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारकडून झाडाझडती सुरू आहे. त्यामुळे मल्ला रेड्डी भांबावले आहेत.

भाजपला तेलंगणात चांगली संधी

बीआरएसमध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी भाजपने सध्या कंबर कसली आहे. कमकुवत होत चाललेला बीआरएस आणि मोदींची संभाव्य लाट यामुळे भाजपला तेलंगणात अनायसे चांगली संधी चालून आल्याचे चित्र दिसत आहे. मजबूत उमेदवार उभे करण्यावर आणि सर्वाधिक जागा मिळवण्यावर भाजपने सारे लक्ष तेलंगणात केंद्रित केले आहे.

भाजपने अनेक निवडणुकांत केसीआर यांच्या पक्षासोबत समझोता केला आणि त्यामुळे या पक्षाची आणि नेतृत्वाची वाढ काहीशी खुरटली. याची वेळीच कल्पना आल्यानंतर भाजपने बंडी संजय कुमार यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे सूत्रे सोपविली. त्यामुळे भाजपला या बदलानंतर तेलंगणात किती जागा मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे.

बीआरएसचे आमदार थांबा आणि पाहाच्या भूमिकेत

आपल्या पक्षाचे सुगीचे दिवस संपत चालल्याची तीव्र जाणीव बीआरएसच्या आमदारांनाही होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे. 4 जून रोजी हे निकाल जाहीर होतील तेव्हा बीआरएसला आणखी गळती लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

खरेतर आधी तेलंगणा राष्ट्र समिती हा निव्वळ प्रादेशिक पक्ष होता. मात्र, नंतरच्या काळात केसीआर यांना अचानक राष्ट्रीय स्तरावरील राजकारण करण्याचे वेध लागले. त्यामुळे त्यांनी टीआरआसचे नामांतर बीआरएस असे केले. तथापि, त्यामुळे वास्तव बदलण्याची शक्यता नव्हतीच. या पार्श्वभूमीवर, नजीकच्या काळात बीआरएसला तेलंगणात आपल्या अस्तित्वासाठी निकराचा संघर्ष करावा लागला, तर आश्चर्य वाटू नये. ( Lok Sabha Election 2024 )

Back to top button