Loksabha election | पक्षप्रवेशासाठी नेत्यांच्या शरद पवारांकडे रांगा! | पुढारी

Loksabha election | पक्षप्रवेशासाठी नेत्यांच्या शरद पवारांकडे रांगा!

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश करण्याची संख्या वाढली असून, ‘मोदीबाग’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी दिवसभर पक्षप्रवेश आणि भेटीगाठीसाठी राज्यातील विविध नेते दाखल झाले. त्यामध्ये बीड, सातारा, माढा मतदारसंघांसंदर्भातील पदाधिकार्‍यांनी शरद पवार यांच्यासमवेत चर्चा केली. पुणे मुक्कामी असलेल्या शरद पवार यांची ‘मोदीबाग’ येथे विविध राजकीय नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. बुधवारी झालेल्या भेटीगाठीमध्ये महादेव जानकर, सातारचे शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी पवार यांच्यासमवेत चर्चा केली.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास महादेव जानकर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडणूक लढवतील, अशी चर्चा काही दिवसांपासून आहे. त्यातच जानकर यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतही चर्चा केली होती. त्यानंतर जानकर यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रीय समाज पक्षाला माढा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्याबाबत बैठकीत अधिकृत निर्णय झाला नाही. जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. जानकर आमचेच असून, ते संपर्कात आहेत. माढा लोकसभेसंदर्भातील उमदेवार लवकरच जाहीर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले. शिवसंग्रामच्या नेत्या आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेश तांत्रिक कारणांमुळे बुधवारी लांबणीवर पडला.

श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनीही पवार यांची भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. वाफगाव किल्ल्यासंदर्भातील ही भेट होती. धनगर समाजाचे जो नेतृत्व करेल आणि समाजाच्या प्रश्नांना न्याय देईल, त्याला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच समाजाच्या भल्यासाठी राजकारणात यावे लागले, तर नक्कीच राजकारणात सक्रिय होईन, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. सातार्‍याचेच आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही पवार यांची भेट घेतली. या बैठकीत मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांत महाविकास आघाडीचे मेळावे घेण्याची सूचना पवार यांनी केली. ’उपरा’कार लक्ष्मण माने यांनीही लातूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात पवार यांच्यासमवेत चर्चा केली. लातूर लोकसभा मतदारसंघातून माने इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडे ही जागा काँग्रेसकडे आहे. या जागेसंदर्भात पवार यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याचे माने यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button