Lok Sabha Election 2024 : बड्यांच्या मांडवात वाजंत्र्यांची मांदियाळी!; राज्यात 145 नोंदणीकृत राजकीय पक्ष

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024

लोकसभेचा राज्यातील खरा रणसंग्राम आठ प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढला जाणार, हे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. या मैदानात राज्यातील अन्य छोट्या-छोट्या राजकीय पक्षांची भूमिका ही केवळ पाठिंब्यापुरती राहील, अशीही चिन्हे दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बड्या राजकीय पक्षांच्या मांडवात राज्यभरातील छोटे-छोटे राजकीय वाजंत्री भाऊगर्दी करताना दिसत आहेत. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

खरी लढत आठ पक्षांमध्येच!

देशभरात एकूण आठ राष्ट्रीय पक्ष, 57 राज्यस्तरीय पक्ष आणि 2301 नोंदणीकृत पक्ष आहेत. महाराष्ट्राचा विचार करता लोकसभेचे रणांगण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे), वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढले जाणार असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रमुख पक्षांशिवाय राज्यात तब्बल 145 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत.

145 नोंदणीकृत पक्ष!

या नोंदणीकृत राजकीय पक्षांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आ. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अनेक गट), आ. विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष, समाजवादी जनता पक्ष, शिवसंग्राम अशा प्रमुख पक्षांचा समावेश आहे. याशिवाय बसप, नाग विदर्भ आंदोलन समिती, विदर्भ विकास पक्ष, रिपब्लिकन सेना, शिवराज्य पक्ष, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, श्रमिक मुक्ती दल, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, लाल निशाण पक्ष, सचेत भारत पक्ष, सत्यशोधक कम्यनिस्ट पार्टी, स्वराज्य निर्माण सेना, स्वराज्य संघटना, भारतीय रिपब्लिकन पक्ष (दोन गट), विदर्भ राज्य निर्माण काँग्रेस असे डझनावारी पक्ष महाराष्ट्रात नोंदणीकृत आहेत.

अनेकांचे अस्तित्व नोंदणीपुरते!

नोंदणीकृत असलेल्या काही मूठभर पक्षांचा अपवाद वगळता अन्य बहुतांश राजकीय पक्षांचे अस्तित्व केवळ नोंदणीपुरतेच असल्याचे दिसून येते. काही काही राजकीय पक्षांची नावेसुद्धा राज्यातील मतदारांना माहीत नाहीत. मात्र, यापैकीच काही पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी आपापल्या भागापुरता का होईना, पण काहीसा राजकीय प्रभाव टाकून आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या या रणमैदानात बड्या राजकीय पक्षांना या छोट्या-छोट्या पक्षांचीही निकड भासताना दिसते. या छोट्या पक्षांपैकी फारसे कुणाचे उमेदवार लोकसभेच्या मैदानात दिसणार नसले, तरी त्या पक्षांचे नेते मात्र वेगवेगळ्या बड्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर मिरवताना हमखास दिसून येतात.

प्रचाराची धुरा आणि धुरळा!

या छोट्या-छोट्या राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत कोणतीही भूमिका घेतली तरी फार मोठा फरक पडत नाही. मात्र, यंदाची लोकसभा अत्यंत अटीतटीची असल्याने बहुतांश बड्या पक्षांच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्या त्या भागातील छोटे पक्ष आणि त्यांचे नेते आपापल्या राजकीय मांडवात गोळा करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद यासह सगळे मार्ग वापरले जात आहेत. बड्या पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच या छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या मिनतवार्‍या आणि सरबराई करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. कारण ऐन निवडणुकीत ही वाजंत्री मंडळीच प्रचाराचा धुरळा उडवून द्यायला उपयोगी पडणार आहेत. हे बड्या राजकीय पक्षांचे नेतेही जाणून आहेत.

आमदारकीपासून अनेक आश्वासनांची खैरात!

आपापल्या भागातील छोट्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना आपल्या तंबूत डेरेदाखल करून घेण्यासाठी बड्या राजकीय पक्षांनी संबंधितांना आमदारकीपासून ते एखाद्या महामंडळाच्या अध्यक्ष पदापर्यंत अनेक आश्वासने द्यायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आजपर्यंत कुठेही दिसून न येणार्‍या या छोट्या राजकीय पक्षांचे शेकडो कार्यकर्ते अचानकच कुठून कुठून उगवून येताना दिसत आहेत आणि आपापले दान पदरात पाडून घेताना दिसत आहेत. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news