Maharashtra Lok Sabha election | ठरलं! मनसे महायुतीत?; राज ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट

Maharashtra Lok Sabha election | ठरलं! मनसे महायुतीत?; राज ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट

पुढारी ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची दिल्लीत भेट घेतली. राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी विनोद तावडे तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील उपस्थित होते. अमित शहांना भेटून राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने त्यांच्या X हँडलवर शेअर केला आहे. (Maharashtra Lok Sabha election) या भेटीतून भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. "मला दिल्लीतून बोलावणे आले आहे. आता दिल्लीत आलो आहे, पाहुया" अशी सूचक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चेसाठी राज ठाकरे दिल्लीत आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
राज ठाकरे दिल्लीत असल्यामुळे मनसे महायुतीचा भाग होणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. आज राज ठाकरे यांनी विनोद तावडेंची भेट घेतली. राज ठाकरेंना किमान दोन लोकसभेच्या जागा हव्या आहेत. आपल्या उमेदवारांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र राज ठाकरे यांच्या उमेदवारांना कमळ या निवडणूक चिन्हावर लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचा फायदा होईल, ही  भाजपची भूमिका आहे, असेही सूत्रांनी सांगितले. मनसे दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागांची मागणी करत असल्याचे समजते.

भाजप नेते, राज ठाकरे एकाच वेळी दिल्लीत

दरम्यान, महाराष्ट्र भाजपची कोअर कमिटीदेखील दिल्ली दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होत आहे. दरम्यान, भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि राज ठाकरे एकाच वेळी दिल्लीत असणे, हा केवळ योगायोग आहे का? की ठरवून दौरा आहे? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. (Maharashtra Lok Sabha election)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news