Lok sabha Election 2024 : बिहारमध्ये NDA च्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, JDU पेक्षा BJPला सर्वाधिक जागा | पुढारी

Lok sabha Election 2024 : बिहारमध्ये NDA च्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, JDU पेक्षा BJPला सर्वाधिक जागा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये जागावाटपाची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 40 जागांपैकी भाजप 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. नितीश कुमार यांची जेडीयू 16 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित जागांपैकी चिराग पासवान यांच्या एलजेपी-रामविलासला 5, जीतन राम मांझी यांच्या एचएएमला 1 आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएमओला 1 जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे यावेळी पशुपती पारस यांच्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या नवादा मतदारसंघात भाजपचा उमेदवार मैदानात उतरवला जाणार आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, जेडीयू नेते संजय झा आणि इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत एनडीएने बिहारमध्ये 39 जागा जिंकल्या होत्या.

तावडे यांनी पाच पक्षांमध्ये विभागलेल्या 40 जागांची यादीही जाहीर केली. या यादीत केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या आरएलजेपीला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमधून आरएलजेपीचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप जुन्या एलजेपीच्या ताब्यात असलेली नवादाची जागा लढवणार आहे. सध्या या मतदारसंघातून पारस यांचे निकवर्तीय चंदन सिंह हे खासदार आहेत. चंदन हे एलजेपीचे ज्येष्ठ नेते सूरजभान सिंह यांचे बंधू आहेत आहेत.

बिहारमध्ये 40 जागा जिंकण्यासाठी भाजपने अलीकडेच चिराग पासवान यांच्यासोबत मोठी रणनिती आखली. भाजपने हाजीपूरसह 5 जागा चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष रामविलास (एलजेपी-आर)ला देण्याची चर्चा केली होती. यासाठी चिराग यांचे काका आणि विद्यमान केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनाही बाजूला करण्यात आले. जागावाटपाच्या घोषणेदरम्यान चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. पत्रकार परिषदेत त्यांच्या पक्षाचा एकही नेता नव्हता.

पारस यांच्या पक्षाचे पाच खासदार आहेत. जे एनडीएचे घटक आहेत. त्यामुळे बिहारमधील एनडीएच्या जागावाटपानंतर हाजीपूरचे विद्यमान खासदार पशुपती पारस यांच्या पक्षाकडे सर्वांच्या नजरा असतील. चंदन सिंह आणि प्रिन्स राज वगळता उर्वरित चार खासदारांपैकी वीणा सिंह आणि मेहबूब अली कैसर चिराग यांच्या पक्षात परतले आहेत. भाजपची यादी आल्यानंतरच पुढे बोलू, असे पारस यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. आता भाजपने ही यादी जाहीर केल्याने एनडीएसह महाआघाडीचीही पारस यांच्या पुढील वाटचालीवर लक्ष असेल.

बिहार लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागा वाटप :

भाजप 17 जागा : पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, अराह, बक्सर आणि सासाराम.

नितीश कुमार यांचा जेडीयू 16 जागा : वाल्मिकी नगर, सीतामढी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जहानाबाद आणि शिवहार.

चिराग पासवान यांचा एलजेपी-रामविलास पक्ष : हाजीपूर, वैशाली, खगरिया, समस्तीपूर आणि जमुई

जीतन राम मांझी यांचा हम बिहार पक्ष : गया

उपेंद्र कुशवाह यांचा आरएलएमओ : करकट

Back to top button