Patanjali hearing | बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, काय आहे प्रकरण? | पुढारी

Patanjali hearing | बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेदिक कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांना अवमानना नोटीसला उत्तर न दिल्याने पुढील सुनावणीच्या तारखेला हजर राहण्यास सांगितले आहे. पतंजली आयुर्वेदने औषधी उपचारांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करणे सुरू ठेवल्याने न्यायालयाने यापूर्वी त्यांना अवमानना नोटीस बजावली होती.

पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्धच्या अवमानना कारवाईत कारणे दाखवा नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दोघांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

२७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल पतंजली आयुर्वेदवर टीका केली होती. तसेच न्यायालयाने कंपनीला रोग उपचार म्हणून उत्पादनांची जाहिरात करण्यापासून प्रतिबंधित केले होते. न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावून न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल संभाव्य अवमानना कारवाईचा इशारा दिला होता.

न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना मागील वर्षी २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या वचनबद्धतेनुसार, कोणत्याही औषध प्रणालीवर टीका करणारे प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निवेदन जारी करू नये अशी ताकीद दिली होती.

पतंजली आयुर्वेदाचे विविध रोगांवर उपचार करण्याच्या औषधांच्या परिणामकारकतेबाबत कथित खोटे दावे आणि जाहिरातींमधील चुकीच्या माहितीबद्दल सरकारला सवाल करत खंडपीठाने, ही देशाची दिशाभूल असल्याची टिप्पणी केली होती.

हे ही वाचा :

Back to top button