Assembly Election 2024 Dates | आंध्र प्रदेशसह ४ राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर, ‘अशा’ आहेत राज्यनिहाय मतदान तारखा | पुढारी

Assembly Election 2024 Dates | आंध्र प्रदेशसह ४ राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर, 'अशा' आहेत राज्यनिहाय मतदान तारखा

पुढारी ऑनलाईन ; निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.१६) लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. (Assembly Election 2024 Dates)

आंध्र प्रदेशमध्‍ये १३ मे राेजी मतदान हाेणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि  सिक्कीममध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होईल. तर ओडिशा विधानसभेसाठी १३ मे, 20 मे 25 मे आणि 1 जून असे चार टप्‍प्‍यात मतदान हाेणार आहे,” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ४ जून राेजी निवडणूक निकाल जाहीर केले जातील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

ओडिशात नवीन पटनायक सहाव्यांदा मुख्यमंत्री बनण्यासाठी मैदानात

आंध्र प्रदेशात १७५, ओडिशा १४७, सिक्कीम ३२, अरुणाचल प्रदेशातील ६० जागांसाठी निवडणूक होत आहे. ओडिशात बिजू जनता दलाचे (BJD) सरकार सत्तेत आहे. येथे नवीन पटनायक २००० पासून मुख्यमंत्रीपदावर कायम आहेत. ते आता सहाव्यांदा मुख्यमंत्री बनण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस विरुद्ध टीडीपी आणि भाजप युतीमध्ये सामना

आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखालील वायएसआर काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. येथे चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी (टीडीपी), अभिनेता पवन कल्याण यांची जनसेना आणि भाजप युती एकत्र निवडणूक लढवत आहेत. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागा आहेत. तर विधानसभेच्या १७५ जागा आहेत. येथे दोन्ही निवडणुका एकत्र होणार आहेत. येथे ५ वर्षापासून जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात वायएसआरसीपी सरकार सत्तेत आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वात तेलुगू देसम पार्टी (Telugu Desam Party) विरोधी पक्ष आहे. ते तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत.

पवन कल्याण विरुद्ध राम गोपाल वर्मा

आंध्र प्रदेशात टीडीपी, भाजप आणि जन सेना पक्ष (JSP) यांची युती असून ते एकत्र निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेच्या १७५ पैकी जन सेना पक्षा २१ जागा लढवणार आहे. तर भाजप १० जागा आणि टीडीपी १४४ जागा लढवणार आहे. पीथापूरम येथील जागेवर चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. कारण येथे दाक्षिणात्य अभिनेते आणि जेएसपीचे प्रमुख पवन कल्याण आणि चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा निवडणुकीच्या निमित्ताने आमने- सामने येणार येतील.

अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचे आव्हान

अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार आहे. भाजपने २०१९ मधील निवडणुकीत ६० पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या.

पवन चामलिंग सत्तेत वापसीसाठी निवडणूक रिंगणात

तसेच सिक्कीममध्ये प्रेम सिंह तमांग यांच्या नेतृत्त्वात सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे (SKM) सरकार सत्तेत आहे. येथील सरकारमध्ये भाजप युती सरकारचा भाग आहे. सिक्कीममध्ये लोकसभेची १ जागा आहे. तर विधानसभेच्या ३२ जागा आहेत. येथे प्रेमसिंह तमांग उर्फ ​​पीएस गोले यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सरकार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एसकेएम पक्षाला १७ जागा मिळाल्या होत्या, तर सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटचे प्रमुख पवन चामलिंग यांच्या पक्षाला १५ जागा मिळाल्या होत्या. पवन चामलिंग हे २४ वर्षे १६६ दिवस मुख्यमंत्री म्हणून होते. आता ते सत्तेत वापसी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. (Assembly Election 2024 Dates)

 हे ही वाचा :

 

Back to top button