पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना खुले पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. तसेच भारतातील नागरिकांचा 'माझे प्रिय कुटुंब…' असा उल्लेख केला आहे. या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भावनिक साद घातली आहे. (Narendra Modi Letter)
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना लिहलेल्या पत्रात सरकारच्या 'विकसित भारत' या संकल्पनेला आकार देण्यासाठी भारतीय नागरिकांकडे सूचना मागितल्या आहेत. तसेच या मोहिमेला पाठबळ देण्याचे आवाहन देखील या पत्राच्या माध्यमातून पीएम मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधानांनी पुढे लिहिले की, 'तुमच्या आणि आमच्या एकत्रतेला आता एक दशक पूर्ण होत आहे. माझ्या 140 कोटी कुटुंबातील सदस्यांसोबतचा विश्वास, सहकार्य आणि पाठिंब्याचे हे मजबूत नाते माझ्यासाठी किती खास आहे हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. (Narendra Modi Letter)
ते पुढे म्हणाले की, माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात आलेला सकारात्मक बदल ही आमच्या सरकारची गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठी उपलब्धी आणि सर्वात मोठी संपत्ती आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रत्येक धोरण आणि प्रत्येक निर्णयाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे अर्थपूर्ण परिणाम आपल्यासमोर आहेत, असेही पीएम मोदी यांनी या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. (Narendra Modi Letter)