‘…तर मराठे डोक्यावर घेऊन नाचतील’; जरांगेंची शिंदे-फडणवीसांकडे शेवटची विनंती | पुढारी

'...तर मराठे डोक्यावर घेऊन नाचतील'; जरांगेंची शिंदे-फडणवीसांकडे शेवटची विनंती

पुढारी ऑनलाईन डेस्क : “आजच्या कॅबिनेटमध्ये सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्यास मराठे त्यांना डोक्यावर घेवून नाचतील. मात्र याबाबत निर्णय नाही घेतला, तर मराठा समाजात नाराजीची लाट राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची काळजी घ्यावी, ही शेवटची विनंती असल्याचे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

अंतरवाली सराटी येथे आज (दि.१६) आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील बोलत होते. आजच्या कॅबिनेट बैठकीत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी समाजाची मागणी असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून दिले जात नाहीत. सरकारने ही अडवणूक थांबवावी. तसेच गृहमंत्र्यांच्या आदेशावरून खोटे गुन्हे दाखल करून समाजाची नाराजी ओढवून घेवू नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज आठवड्यातील तिसरी बैठक

लोकसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा होणार असल्याने राज्यातील महायुती सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या आठवड्यातील ही तिसरी बैठक आहे. या बैठकीत लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता असून, काही जम्बो निर्णयांवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यतेमुळे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तब्बल ३३ निर्णयांवर मोहर उठविली होती. यात, शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव लावण्यासोबतच बीडीडी चाळीतील सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क माफी आणि मुंबईतील रेसकोर्स येथे मुंबई सेंट्रल पार्क उभारण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. पुन्हा बुधवारी दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत एकूण २६ निर्णय घेण्यात आले. आता आज सह्याद्री अतिथीगृहात तिसरी बैठक बोलावण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button