Maharashtra Politics : मुंबईतील ठाकरे गटाचे दोन आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात! | पुढारी

Maharashtra Politics : मुंबईतील ठाकरे गटाचे दोन आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणखी दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. हे दोन्ही आमदार पूर्व उपनगरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या आहेत तेथेच राहा, असा सल्ला खुद्द शिंदेंकडून या आमदारांना देण्यात आला आहेत. त्यामुळे या आमदारांचा प्रवेश लोकसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई शहर व उपनगरातील शिवसेनेचे दिलीप लांडे, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे हे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोबत गेले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत 9 आमदार राहिले. हे नऊ आमदार ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. काही आमदारांचे तर कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे या आमदारांना सहजासहजी फोडणे शक्य नाही. पण मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी या आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे याला भाजपाकडूनही छुपी साथ मिळत असल्याचे समजते. दरम्यान, आमदार फोडाफोडीमध्ये शिंदे गटाला यशही आले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांचे बिझनेस पार्टनर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून कौटुंबिक संबंध असलेले जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसैनिकांसह सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. वायकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना ईडीची भीती दाखवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्यामुळे ते मजबुरीने शिंदे गटात गेल्याचे उबाठा नेते सांगत आहे. मात्र वायकरांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी धक्काच मानला जात आहे.

दरम्यान, मुंबई शहर व उपनगरातील ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे वगळता अन्य 7 आमदारांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची आमदारांशी चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कातही काही आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी दोन आमदारांशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोलणे झाल्याचेही समजते. दोन्ही आमदार पूर्व उपनगरातील आहेत.

उमेदवारीची अट घातली

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी या आमदारांनी येणार्‍या विधानसभेमध्ये उमेदवारी मिळावी, अशी अट टाकल्याचे समजते. दोन्ही आमदारांचे विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाचे बालेकिल्ले मानले जातात. पण आमदारांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यास या विधानसभेतील निवडणूक चुरशीची होऊ शकते. सध्या या आमदारांनी शिंदे गटात प्रवेश करू नये, असा सल्ला खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. लोकसभेनंतर अथवा विधानसभेच्या तोंडावर त्यांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो.

ठाकरे गटाकडे असलेले आमदार

शहर : आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी)
पश्चिम उपनगर : संजय पोतनीस (कलीना), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व),
सुनील प्रभू (दिंडोशी)
पूर्व उपनगर : प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत (विक्रोळी),
रमेश कोरगावकर (भांडूप)

Back to top button