

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असे म्हटले जाते आणि वधू आणि वर यांच्यातील गूण जुळण्यासाठी कुटुंबीयांची धडपड असते. पण दिल्लीतील एका लग्नात वधू आणि वराचे गूण चांगलेच जुळले आहे. दिल्ली परिसरातील नामचीन गँगस्टर लग्न करत आहे. आणि त्याची वधू राजस्थानातील गँगस्टर आहे. हा युवक तुरुंगात असून त्याला या लग्नासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने काही तासांचा पॅरोल मंजुर केला आहे. (Gangster Marriage)
या गँगस्टर युवकाचे नाव संदीप उर्फ काला जठेडी असे आहे, आणि तो सध्या तिहार तुरुंगात आहे. तर वधूचे नाव अनुराधा चौधरी असून तिची राजस्थानात ओळख मॅडम मिंझ अशी आहे. मंगळवारी (१२ मार्च) दिल्लीपासून जवळ असलेल्या द्वारका या जिल्ह्यातील संतोष गार्डन या लॉनमध्ये हा विवाहसोहळा होत आहे. संदीप हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. (Gangster Marriage)
दोन गँगस्टरचे लग्न असल्याने पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. दिल्ली पोलिसांनी २५० पोलिस कर्मचारी, SWAT कमांडो, क्राईम ब्रँचची टीम, हरियाणा पोलिसांची गुन्हे अन्वेशष शाखा असे तगडा बंदोबस्त या लग्नासाठी ठेवावा लागलेला आहे.
संदीप हा अतिशय धोकादायक गुन्हेगार आहे. तसेच पोलिसांच्या कोठडीतून पलायन करण्यात तो तरबेज आहे, त्यामुळे पोलिसांना इतका मोठा बंदोबस्त ठेवावा लागलेला आहे. २०२०मध्ये त्याला फरिदाबाद न्यायालयात नेले जात होते, त्या वेळी त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार करून संदीपला पळवून नेले होते. त्यानंतर २०२१मध्ये संदीप आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांनी दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये गोळीबार करून कुलदीप सिंग या त्याच्या सहकाऱ्याला पळवून नेले होते. नंतर कुलदीप पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला होता.
संदीप हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. संदीपवर विविध राज्यांत चोऱ्या, खून, दरोडे, खुनाचे प्रयत्न, खंडणी असे विविध गुन्हे दाखल आहेत. सुपारी घेऊन खून करणे, व्यावसायिकांकडून खंडण्या उकळणे असेही गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.
अनुराधा चौधरी हिचाही गुन्हेगारी इतिहास आहे. अपहरण आणि खंडण्यांचे गुन्हे तिच्यावर नोंद आहेत. राजस्थानातील गँगस्टर आनंद पाल हिच्यासाठी ती काम करते. राजस्थान आणि हरियाणा या दोन राज्यांत तिचे नेटवर्क आहे.
हेही वाचा