वॉशिंग्टन : वृत्तसंस्था : युक्रेन युद्धात निर्माण झालेले अण्वस्त्र हल्ल्याचे संकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाने टळल्याचे वृत्त सीएनएनने अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. रशिया युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर अमेरिकेने भारत आणि काही तटस्थ देशांशी संपर्क साधला. भारताची मध्यस्थी कामाला आली, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सीएनएनने बायडेन प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिका-यांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त देताना म्हटले आहे की, २०२२ मध्ये सुरू झालेल्या युक्रेनच्या युद्धात एक वेळ अशी आली की रशिया युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याची माहिती बायडेन प्रशासनाला मिळाल्यानंतर धावपळ उडाली. कारण असा काही प्रकार झाला असता तर हिरोशिमा नागासाकीनंतर जगातील तो पहिला अण्वस्त्र हल्ला ठरला असता व त्यात अपरिमित हानी झाली असती व त्याचे परिणाम काहीही होऊ शकले असते. त्यामुळे पुतीन यांची समजूत काढण्यासाठी नावांचा शोध सुरू झाला. त्यात या युद्धात तटस्थ असणाऱ्या देशांचा विचार करण्यात आला. भारत, चीन व ग्लोबल साऊथ देश यांचा पर्याय समोर आला. त्यात पुतीन यांच्याशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांनी पुतीन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अण्वस्त्र हल्ल्याचे संकट टळले, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गतवर्षी एससीओच्या बैठकीत पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली होती. त्यावेळी मोदी यांनी पुतीन यांना स्पष्टपणे सध्याचा काळ हा युद्धाचा काळ नाही, असे सांगितले होते, हे वाचकांना आठवत असेलच.
हेही वाचा :