Lok Sabha Election : ममतांच्‍या ‘एकला चलो’वर काँग्रेसची ‘तिखट’ प्रतिक्रिया, “पंतप्रधान नाराज होण्‍याची…” | पुढारी

Lok Sabha Election : ममतांच्‍या 'एकला चलो'वर काँग्रेसची 'तिखट' प्रतिक्रिया, "पंतप्रधान नाराज होण्‍याची..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तृणमूल काँग्रेसने आज (दि. १० मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी राज्‍यातील सर्व ४२ मतदारसंघांमधील उमेदवारांच्‍या नावांची घाेषणा केली. तृणमूल काँग्रेसच्‍या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍या या निर्णयावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी बोचरी टीका केली आहे. ( Lok Sabha Election : Congress Vs Trinamool Congress )

अधीर रंजन चौधरी यांनी म्‍हटले आहे की, “पश्‍चिम बंगालमधील लोकसभेच्‍या सर्व जागांवर निवडणूक लढविण्‍याची घोषणा तृणमूल काँग्रेसने केली आहे. मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील, या भीतेने स्‍वत:ला भाजप विरोधी इंडिया आघाडीतून वेगळे केले आहे. इंडिया आघाडीत राहिले पंतप्रधान मोदींच्‍या विरोधात जावे लागेल. ते वारंवार पश्‍चिम बंगालमध्‍ये ईडी आणि ईडी आणि सीबीआयला पाठवतील. यामुळे तृणमूलचे अस्‍तित्‍व धोक्‍यात येईल. त्यामुळे पंतप्रधान मोदींना नाराज होण्यापासून रोखण्यासाठीच ममता बॅनर्जी यांनी स्‍वबळावर निवडणूक लढविण्‍याचा निर्णय घेतला आहे.” ( Lok Sabha Election : Congress Vs Trinamool Congress )

…. तर युसूफ पठाणला राज्‍यसभेवर पाठवायला हवे होते

तृणमूल काँग्रेसने माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्‍याचा सामना अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. याबाबत बोलताना चौधरी म्‍हणाले की, तृणमूल काँग्रेसला युसूफ पठाण यांचा सन्मान करायचा होता, तर त्‍यांना राज्यसभेवर पाठवायला हवे होते. युसूफ पठाण हे मूळचे गुजरातमधील आहेत.  ममता बॅनर्जी यांचा हेतू चांगला असता तर त्‍यांनी युसूफ पठाण यांच्‍यासाठी गुजरातमध्ये एक जागा मागितली असती; पण पश्चिम बंगालमध्ये सामान्य माणसाचे ध्रुवीकरण करण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेसविराेधात त्यांनी युसूफ पठाणची निवड केली आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

तृणमूल काँग्रेस भाजपविरोधात लढणार नाही

तृणमूल काँग्रेसने स्‍वबळावर निवडणूक लढण्‍याची घोषणा करत नरेंद्र मोदींना संदेश दिला आहे की, त्‍या भाजपविरोधात लढणार नाहीत, असेही अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी सांगितले. ( Lok Sabha Election : Congress Vs Trinamool Congress )

जयराम रमेश यांनीही व्‍यक्‍त केली नाराजी

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही तृणमूल काँग्रेसच्‍या निर्णयावर नाराजी व्‍यक्‍त केली आहे. ‘एएनआय’शी बोलताना ते म्‍हणाले, अशा प्रकारे जागांचे एकतर्फी घोषणा करायला नको होती. तृणमूल काँग्रेसवर कोणता दबाव होता हे मला माहित नाही. काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये तृणमूलसोबत सन्माननीय जागावाटपाचा फॉर्म्युला हवा होता. पक्ष याबाबत चर्चा करण्‍यासही तयार होता. काही तडजोड करा. वाटाघाटी आणि जागावाटप चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असे आम्ही नेहमीच म्हटले होते. पण जागांची एकतर्फी घोषणा होणे योग्‍य नाही.”

हेही वाचा :

Back to top button