Lok Sabha Elections 2024 : जम्‍मू-काश्‍मीर विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबरच? गृह मंत्रयाल-निवडणूक आयोगाची चर्चा | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : जम्‍मू-काश्‍मीर विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबरच? गृह मंत्रयाल-निवडणूक आयोगाची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीबरोबरच जम्‍मू-काश्‍मीरमध्‍येही विधानसभा निवडणूक होण्‍याची शक्‍यता आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्‍ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सुरक्षा दलांच्या तैनातीबाबत आयोगाने गृह मंत्रालय तसेच रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्‍यामुळे लोकशभा आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीबरोबरच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

३० सप्‍टेंबरपर्यंत निवडणूक घेण्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आदेश

केंद्र सरकारने जम्‍मू-काश्‍मीरला विशेषाधिकारी बहाल करणारे कलम ३७० हटविण्‍याचा निर्णय योग्‍यच असल्‍याचे स्‍पष्‍ट करत वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घाव्‍यात, असे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने डिसेंबर २०२३ दिले होते.

निवडणूक आयोग आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभांचा कार्यकाळही जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अरुण गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्‍या उपस्‍थितीत बैठक झाली. निवडणूक आयोगाचे एक पथक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात जम्मू-काश्मीरला जाणार असल्‍याचा निर्णय या बैठकीत घेण्‍यात आला.

कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिली निवडणूक

५ ऑगस्‍ट २०१९ रोजी जम्‍मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करण्‍याचा निर्णय केंद्र सरकारे घेतला होता. यानंतर जम्मू-काश्मीरचे दोन भाग झाले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर कलम ३७० रद्द केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असेल.आता जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या 83 वरून 90 झाली आहे. यामध्ये पाकव्याप्त जम्मू-काश्मीरसाठी राखीव जागांचा समावेश नाही.

हेही वाचा : 

 

Back to top button