Lok Sabha Elections 2024 | वयोवृद्ध मतदार आता घरुनच करणार टपाली मतदान | पुढारी

Lok Sabha Elections 2024 | वयोवृद्ध मतदार आता घरुनच करणार टपाली मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी दिव्यांगांप्रमाणेच ८० वर्षावरील वयस्कर मतदारांना घरबसल्या टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. घरून किंवा मतदान केंद्रात येऊन मतदान करण्याचाही पर्याय त्यांना उपलब्ध असेल. अशा ज्येष्ठ नागरिकांचा आताच शोध घ्यावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची जबाबदारीही अधिक वाढली आहे. (Lok Sabha Elections 2024)

जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा पार पडला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतलेल्या बैठकीप्रसंगी सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, दिव्यांग मतदारांच्या धर्तीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांचे काम वाढले आहे. परिणामी, आतापासून अशा मतदारांना शोध घेत मतदानाच्या दिवशी त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, अशा सूचना केल्या. (Lok Sabha Elections 2024)

निवडणूक कार्यक्रमावेळी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. निवडणूक घोषित होताच राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे काढण्यात यावे, कंट्रोलरूम व सर्व पथके कार्यान्वित करावे. तसेच व्हिडिओग्राफर्स पथके, खर्च निरीक्षक पथके तैनात करताना राजकीय पक्षांच्या रॅली व खर्चावर लक्ष ठेवावे, असे निर्देशही शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यापासून ते मतदान व मतमोजणीच्या दिनापर्यंत सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश जलज शर्मा यांनी दिले. ईव्हीएम, मतदारयादी तयारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्ट्राॅंगरूम, साहित्य वितरण, मतदानानंतर ईव्हीएम केंद्रीय वेअर हाउसमध्ये सुरक्षितपणे जमा करणे आदींबाबत शर्मा यांनी सविस्तर आढावा घेतला.

जिल्ह्यात किती मतदार

जिल्ह्यात ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या वृध्द मतदारांची संख्या सद्य:स्थितीत १ लाख ३२ हजार ५३२ एवढी आहे.

घरबसल्या मतदान करता यावे यासाठी काय कराल?

-ज्यांचे वय ८० वर्षांपुढील आहे अशा मतदारांनी ‘१२ ड’ हा अर्ज भरून द्यावा. मतदानाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसांच्या आत हा अर्ज भरून द्यावा लागेल
-हे अर्ज बीएलओंकडून वितरित व संकलित केले जातील
-वृद्धांना केंद्रावर पोहोचून मतदान करायचे असेल तर निवडणूक विभाग सहाय्यक पुरवेल.

हेही वाचा :

Back to top button