पुढारी ऑनलाईन : कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर आले. या दरम्यान, त्यांनी श्रीनगर येथील बक्षी स्टेडियमवरील 'विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर' कार्यक्रमात जम्मू काश्मीरमधील कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ६,४०० कोटींच्या ५३ प्रकल्पांचे लोकार्पण केले. (PM Modi Kashmir Visit) यावेळी त्यांनी काश्मीरवासीयांना संबोधित करताना कलम ३७० वर भाष्य केले.
"आज जम्मू-काश्मीर विकासाच्या नव्या उंचीवर आहे. कारण जम्मू-काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे. हे निर्बंधांपासूनचे स्वातंत्र्य कलम ३७० हटवल्यानंतर मिळाले आहे. अनेक दशकांपासून राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ३७० च्या नावाखाली जम्मू-काश्मीरमधील जनतेची दिशाभूल केली. तसेच त्यांनी देशाची दिशाभूल केली." अशा शब्दांत पीएम मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आज कलम ३७० नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या प्रतिभेचा पूर्ण आदर केला जात आहे आणि त्यांना नवीन संधी मिळत आहेत. आज येथे प्रत्येकाला समान अधिकार आणि समान संधी आहेत. कलम ३७० चा जम्मू-काश्मीरला फायदा झाला का? काही राजकीय कुटुंबे त्याचा फायदा घेत होती? असा आरोप त्यांनी केला.
आपली दिशाभूल झाल्याचे जम्मू-काश्मीरच्या जनतेला कळाले आहे. काही कुटुंबांच्या फायद्यासाठी जम्मू-काश्मीरला निर्बंधात ठेवले होते, असाही घणाघात त्यांनी केला. (PM Modi Kashmir Visit)
येथील सरोवरांमध्ये सर्वत्र कमळ दिसतात. ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या लोगोवरही कमळ आहे. भाजपचे चिन्हही कमळ आहे आणि जम्मू-काश्मीरचा कमळाशी खोलवर संबंध आहे. हा आनंददायी योगायोग आहे की निसर्गाने दिलेला कोणताही इशारा आहे, असेही ते म्हणाले.
पर्यटनासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये शेती आणि कृषी उत्पादनांचीही ताकद आहे. जम्मू काश्मीरचे केशर, सफरचंद, येथील मेवा, चेरी हे सर्व पाहाता जम्मू-काश्मीर हा एक मोठा ब्रँड असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :