केजरीवाल हाजीर हो…! : ‘ईडी’च्‍या तक्रारीवर न्‍यायालयाचे समन्‍स | पुढारी

केजरीवाल हाजीर हो...! : 'ईडी'च्‍या तक्रारीवर न्‍यायालयाचे समन्‍स

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कथित मद्य घाेटाळा प्रकरणी समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीच्या दुसऱ्या तक्रारीवर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्‍यायालयाने आज ( दि. ७ मार्च) दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन समन्स जारी केल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.  या प्रकरणी वारंवार समन्‍स बाजवूनही केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. याविरोधात सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्‍हा एकदा न्‍यायालयात धाव घेतली होती.

१६ मार्चला चौकशीसाठी चौकशीसाठी समन्स

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात समन्स चुकवल्याप्रकरणी ईडीने केलेल्या नव्या तक्रारीनंतर दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १६ मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

दारू घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी 22 फेब्रुवारीलाही ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. पण सातव्या समन्सवरही केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत. यापूर्वी, गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि यावर्षी 3 जानेवारी, 18 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडून 12 मार्चनंतरची नवीन तारीख मागितली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

काय आहे प्रकरण ?

दिल्ली सरकारने 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ज्या दारू (मद्य) व्यापाऱ्यांना परवाने दिले होते, त्यांनी त्यासाठी लाच दिली होती. परवानेही आम आदमी पार्टीच्‍या मर्जीतील मद्य व्यापाऱ्यांनाच दिले गेले होते, असा आरोप आहे. आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी अनियमिततेमुळे मद्य धोरण रद्द केले होते आणि सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा :

 

 

Back to top button