पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालची भूमी ही बंगालची भूमी स्त्री शक्तीचे प्रेरणास्थान आहे, येथूनच स्त्री शक्तीने देशाला दिशा दिली; पण तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत याच भूमीवर स्त्री शक्तीवर अत्याचाराचे घोर पाप घडले आहे. संदेशखली येथे झालेली घटनेमुळे मान शरमेने झुकतं; पण राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारला या दु:खाची पर्वा नाही. महिलांवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी तृणमूल सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर आज ( दि. ६ मार्च) हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिलह्यातील बारासातमधील जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे नेते गरीब, दलित आणि आदिवासी कुटुंबातील बहिणी आणि मुलींवर अनेक ठिकाणी अत्याचार करत आहेत. मात्र तृणमूल काँग्रेस सरकारचा आपल्या अत्याचारी नेत्यावर विश्वास आहे. त्यांचा बंगालमधील महिलांवर विश्वास नाही. सरकारच्या या भूमिकेवर बंगालसह देशातील महिला संतप्त आहेत. स्त्रीशक्तीच्या संतापाची ही लाट केवळ संदेशखालीपुरती मर्यादित राहणार नाही. केवळ मतांचा विचार करणार्या आणि दलालांसाठी काम करणार्या तृणमूल सरकार आपल्या बहिणी आणि मुलींना कधीही सुरक्षा देऊ शकत नाही, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी अगदी फाशीच्या शिक्षेचीही व्यवस्था करणारे भाजपचे केंद्र सरकार आहे. संकटकाळात भगिनींना सहज तक्रार करता यावी, यासाठी महिला हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे; परंतु तृणमूल काँग्रेसचे सरकार येथे ही प्रणाली लागू करू देत नाही. महिला विरोधी तृणमूल सरकार महिलांना कधीच सुरक्षा देवू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
केंद्र सरकारमध्ये एनडीएचे निश्चित पुनरागमन पाहून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे नेते घाबरले आहेत. या आघाडीचे भ्रष्ट लोक माझ्या कुटुंबाबद्दल विचारत आहेत. मोदींना स्वतःचे कुटुंब नाही, म्हणूनच मी कुटुंबवादाच्या विरोधात बोलतो, असे ते सांगत आहेत; पण माझ्यासाठी संपूर्ण देश हेच एक कुटुंब आहे. मोदींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण या कुटुंबाला समर्पित आहे. आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक बहीण आणि मुलगी म्हणत आहे… मी मोदींचा परिवार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :