नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात ६ आमदारांनी पक्षादेश झुगारुन मतदान (क्रॉस व्होटिंग) केले होते. यापैकी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस असलेले माजी मंत्री आणि आमदार सुधीर शर्मा यांची चिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज (दि.६) आदेश काढले. तत्पूर्वी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. Sudhir Sharma
हिमाचल प्रदेशमध्ये २७ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. यावेळी काँग्रेस आमदार सुधीर शर्मा यांच्यासह ६ आमदारांनी भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ क्रॉस व्होटिंग केले. परिणामी पक्षाकडे अपेक्षेपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पक्षाने कारवाईचा बडगा उगारत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस आमदार सुधीर शर्मा यांच्यावर कारवाई केली.
हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथून आमदार असलेले माजी मंत्री शर्मा यांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केले होते. त्यानंतर त्यांना आमदार म्हणून अपात्रतेचा सामना करावा लागला होता. त्यापाठोपाठ आता पक्ष संघटनेतील पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी ५ मार्च रोजी पक्षाने सहा आमदारांना क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी अपात्र ठरवले होते. अपात्र ठरलेल्या आमदारांमध्ये राजिंदर राणा, सुधीर शर्मा, इंदर दत्त लखनपाल, देविंदर कुमार भुटू, रवी ठाकूर आणि चेतन्या शर्मा यांचा समावेश आहे. या आमदारांनी २९ फेब्रुवारीला राज्य विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंग पठानिया यांनी जाहीर केलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विधानसभेतील ६ आमदार अपात्रतेनंतर, सभागृहाचे संख्याबळ ६८ वरून ६२ झाले आहे. तसेच काँग्रेस आमदारांची संख्या ४० वरून ३४ वर घसरली. हिमाचल प्रदेशच्या इतिहासात पक्षांतर रोखण्याच्या उद्देशाने पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत आमदारांना अपात्र ठरविण्याची ही पहिलीच घटना आहे.
हेही वाचा