ओमिक्रॉन : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार 'ॲक्शन मोड' मध्ये | पुढारी

ओमिक्रॉन : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार 'ॲक्शन मोड' मध्ये

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सध्या जगभरात कोरोना व्‍हायरसच्‍या (विषाणू) ओमिक्रॉन या नव्या व्‍हेरियंटमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संशोधक या व्हॅरियंटवर लक्ष ठेवून आहेत. या व्हायरसबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची बैठक घेतली. केंद्राने याबाबत सर्व राज्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधत विविध उपयायोजनांवर चर्चा करणार असल्याचे समजते.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आंतरराष्ट्रीय विमानांबाबत काय करायचे त्याबद्दल केंद्र निर्णय घेणार आहे. त्या निर्णयाची आपल्याकडे अंमलबजावणी होईल. प्रवाशांना विलगीकरणात अथवा इतर कोणती उपाययोजना करायची याबाबत योग्य ती कार्यवाही केंद्राच्या सुचनेनंतर केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे डोमेस्टिक विमानातून प्रवास केल्यानंतर विमानतळावरील चेकिंग संदर्भातील काही नियम काढण्यात आले असून, विदेशातून येणाऱ्या लोकांना औपचारिकतेबाबत केंद्र शासन जो निर्णय घेईल त्याचे पालन करावे लागणार आहे. नाट्यगृह आणि इतर कार्यक्रमांना 1 डिसेंबर पासून 100% उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 1 डिसेंबर पासून शाळा या पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे. या वेळी कार्यक्रमात, शाळेत कोविडचे नियम पाळूनच प्रवेश मिळणार आहे.

ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळं गरज पडल्यास राज्यातही काही निर्बंध लावावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम कडकरित्या पाळावेत, असे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ओमिक्रॉनची लक्षणे कोणती हे अद्याप स्‍पष्‍ट नाही

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रमण गंगाखेडकर ( Dr Raman Gangakhedkar) यांनी कोरोनाच्‍या नव्‍या व्‍हेरियंट आणि त्‍याच्‍या परिणामाबद्‍दल आपलं मत व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, दक्षिण आफ्रिकेतील नवा व्‍हेरियंटची भीती किती खरी आहे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. ओमिक्रॉनची लक्षणे कोणती हे अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. या विषाणूचा संसर्ग झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये वेगळी लक्षणे दिसतात का, हेही कळालेली नाही. तसेच त्‍याची तीव्रता, किती जणांना रुग्‍णालयात दाखल करावे लागले. किती जणांचा मृत्‍यू झाला याबाबतही अद्‍याप ठोस माहिती नाही. त्‍यामुळे आताच यावर खूप चर्चा करुन घाबरण्‍याचे कारण नाही. जगभरात कोणत्‍याही देशात नवीन व्‍हेरिएंट दिसला की तत्‍काळ उपाययोजना केल्‍या जात आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button