Lok Sabha Election 2024 | ‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’! लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपचा नारा

Lok Sabha Election 2024 | ‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’! लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपचा नारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रोफाइल बदलले आहे. त्यांनी त्यांच्या x हँडलवरील नावापुढे "मोदी का परिवार" असे ठेवले आहे. भाजपने २०१९ मधील निवडणुकीदरम्यान 'चौकीदार' अशी मोहीम राबवली होती. आता त्यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मोदी का परिवार' असा नारा दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

विशेष म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी एका रॅलीत पंतप्रधान मोदी यांना "स्वतःचे असे कुटुंब नाही" अशी टीका केल्यानंतर काही तासांनंतर भाजपने "मोदी का परिवार" असा नारा दिला आहे.

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे ठेवले होते. त्यानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावापुढे 'चौकीदार' लावले होते.

नुकत्याच झालेल्या तेलंगणातील आदिलाबाद येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे नवीन घोषवाक्य "तुम्ही मोदींचे आणि मोदी आपले आहेत" असे आहे. ते असेही म्हणाले, "संपूर्ण देश आज एका आवाजात म्हणत आहे, 'मैं हू मोदी का परिवार' (मी मोदींचा परिवार आहे)".

रविवारी पाटणा येथील गांधी मैदानावरील 'जनविश्वास महा रॅली'ला संबोधित करताना लालू प्रसाद यादव यांनी पीएम मोदींच्या घराणेशाहीवर केलेल्या वक्तव्यावर टीका केली होती. लालू प्रसाद म्हणाले, "जास्त मुले असलेल्या लोकांना यावरून अपमानित केले जाते." मोदींचे "स्वतःचे असे कुटुंब नाही.".

"मोदी का परिवार" ही भाजपची नवीन घोषणा २०१९ च्या "मैं भी चौकीदार हूँ" घोषणेची आठवण करून देणारी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल करार कथित भ्रष्टाचार प्रकरणावरुन 'चौकीदार चोर है' असा गंभीर आरोप केला होता.

२०१४ मध्ये मोदींनी पंतप्रधान झाल्यावर हा शब्द वापरण्यास सुरुवात केल्यानंतर 'चौकीदार' हा शब्द चर्चेत राहिला होता.

मे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदींनी त्याच वर्षी मार्चमध्ये #MainBhiChowkidar या हॅशटॅगसह ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती. आता २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने "मोदी का परिवार" मोहीम सुरु केली आहे. (Lok Sabha Election 2024)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही X वर 'मैं हूँ मोदी का परिवार' असे म्हणत पोस्ट केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news