ISRO Indian space station : ४०० टन वजन, ४ मॉड्यूल; ISRO चे पहिले ‘स्पेस स्टेशन’ असेल खूप खास, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये | पुढारी

ISRO Indian space station : ४०० टन वजन, ४ मॉड्यूल; ISRO चे पहिले 'स्पेस स्टेशन' असेल खूप खास, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) भारताच्या पहिल्या स्पेस स्टेशनसंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारताच्या अंतराळ योजनांचा महत्त्वाकांक्षी भाग असलेल्या भारतीय अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) निर्मितीच्या कामाला लवकरात लवकर सुरूवात केली जाईल. अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी दिली आहे. स्पेस स्टेशनचे पहिले मॉड्यूल येत्या काही वर्षांत लॉन्च केले जाऊ शकते, अशी शक्यतादेखील सोमनाथ यांनी व्यक्त केली आहे. ४०० टन वजन, ४ मॉड्यूल असणारे ISRO चे हे पहिले ‘स्पेस स्टेशन’ खूप खास असणार आहे. या संदर्भातील वृत्त NDTV ने दिले आहे. (ISRO Indian space station)

स्वतःचे स्पेस स्टेशन बनवणारा भारत हा चौथा देश ठरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO साठी एक महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे. भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन, 2035 पर्यंत सुरू होईल. यासाठी ISRO ने आधीच स्पेस स्टेशनसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हे अंतराळ स्थानक तयार करण्यात येणार आहे. अंतराळात उभ्या करण्यात येणाऱ्या भारताच्या अंतराळ स्टेशनात २ ते ४ अंतराळवीर थांबू शकतात. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी स्वत:ची अंतराळ स्थानके कक्षेत उभी केली आहेत. यानंतर अंतराळात स्वतंत्र स्पेस स्टेशन असणारा भारत हा चौथा देश ठरू शकतो, असेदेखील एस.सोमनाथ यांनी स्पष्ट केले आहे. (ISRO Indian space station)

शक्तिशाली रॉकेट ‘बाहुबली’ साकारणार विशेष भूमिका

तिरुअनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. उन्नीकृष्णन नायर यांनी या मोहिमेविषयी ‘NDTV’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारतीय स्पेस स्टेशनचे काम जोरात सुरू आहे. अंतराळ स्टेशन स्थापित करण्यासाठी लागणारे घटक पृथ्वी कक्षेत जवळपास ४०० किमी वरील कक्षेत पोहोचवण्यासाठी भारतातील सर्वात शक्तिशाली रॉकेट, बाहुबली किंवा लॉन्च व्हेईकल मार्क 3 वापरण्याची योजना आखण्यात येत असल्याचे देखील डॉ. उन्नीकृष्णन नायर यांनी स्पष्ट केले आहे. (ISRO Indian space station)

भारताच्या स्पेस स्टेशनचे वजन 400 टन असणार?

खगोलशास्त्राच्या प्रयोगांसह अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा वापर करण्याची आणि चंद्राच्या पृष्ठभागावर जीवनाची शक्यता शोधणे यासाठी अवकाश स्थानकाचा वापर करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे. इस्रोच्या प्राथमिक अंदाजानुसार, अंतराळ स्थानकाचे वजन सुमारे 20 टन असू शकते. हे घन संरचनांचे बनलेले असेल, परंतु त्यात फुगवण्यायोग्य मॉड्यूलदेखील जोडले जाऊ शकतात. पूर्ण तयारीनंतर, स्पेस स्टेशनचे एकूण वजन सुमारे 400 टनांपर्यंत जाऊ शकते, असे देखील भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) म्हटले आहे.

हे ही वाचा:

Back to top button