पुढारी ऑनलाईन : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी आज बुधवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत वीरभद्र सिंह यांचा अनादर केल्याचा आरोप करत राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आज सकाळी मंत्रीपदावरून पायउतार झाले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. (Himachal political crisis)
काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले "…जे राज्यात ६ वेळा मुख्यमंत्री राहिले, ज्यांच्यामुळे राज्यात हे सरकार स्थापन झाले. त्यांना मॉल रोडवर त्यांच्या पुतळ्यासाठी जागा मिळू शकली नाही. माझ्या दिवंगत वडिलांप्रती हा या सरकारचा आदर आहे का?. आम्ही संवेदनशील आहोत, पोस्ट्सशी आमचा काहीही संबंध नाही… पण हे अत्यंत दुर्दैवी आहे… मी राजकीय नव्हे तर भावनिकदृष्ट्या खूप दुखावलो आहे."
राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे दिसते. यानंतर काॅंग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते.
काँग्रेसचे ६ आमदार आणि ३ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने भाजप उमेदवाराचा विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सरकार अस्थिर झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा आणि डीके शिवकुमार यांना नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी पाठवले आहे. (Rajya Sabha Election 2024)
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ६ आमदार शिमल्याहून हरियाणाकडे रवाना झाले होते. ते भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्याची भाजपची योजना असल्याच्या वृत्तांमुळे हिमाचल प्रदेशात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Himachal political crisis)
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह विपिन सिंह परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंह गांधी, दिलीप ठाकूर आदी १५ भाजप आमदारांवर आज विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यामुळे सभागृहाचे कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.
हे ही वाचा :