कर्नाटक विधानसभेत काँग्रेस समर्थकांच्‍या ‘पाकिस्‍तान जिंदाबाद’च्‍या घोषणा : भाजपचा दावा | पुढारी

कर्नाटक विधानसभेत काँग्रेस समर्थकांच्‍या 'पाकिस्‍तान जिंदाबाद'च्‍या घोषणा : भाजपचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटक राज्‍यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. यानंतर कर्नाटक विधानसभेत काँग्रेस समर्थकांकडून पाकिस्‍तान जिंदाबादच्‍या घोषणा देण्‍यात आल्‍या, असा दावा भाजपने केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे. दरम्‍यान, या प्रकरणी काँग्रेसचे राज्‍यसभा खासदार नसीर हुसैन यांनी एक व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

काय आहे प्रकरण ?

कर्नाटकमध्‍ये चार जागांसाठी मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली. यामध्‍ये काँग्रेसचे अजय माकन, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर हे अनुक्रमे ४७, ४६ आणि ४६ मतांनी विजयी झाले. या विजयानंतर साजरा करण्‍यात आलेल्‍या उत्‍सवाबाबत भाजपने एक व्हिडिओ शेअर केला आहे.राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सय्यद नसीर हुसैन यांच्‍या समर्थकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे.

भाजपने दाखल केली तक्रार

काँग्रेस नेत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करावी, अशी मागणी करणारी तक्रार त्री उशिरा हुसैन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. भाजपचे आमदार एन. रविकुमार आणि पक्षाचे आमदार आणि मुख्य सचेतक दोड्डंगौडा पाटील यांनी हुसेन आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध विधान सौधा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राज्यसभा खासदार नसीर हुसेन यांचे स्पष्टीकरण

नसीर हुसैन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, आमच्या पक्षाचे काही समर्थक, कार्यकर्ते आणि काही लोक तीन उमेदवारांच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा त्यांच्यात मीही होतो. काही कार्यकर्त्यांनी ‘नसीर हुसेन जिंदाबाद’, ‘नसीर खान झिंदाबाद’, ‘नसीर साहेब झिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. तेथून माझ्या घरी जाताना अचानक मला फोन आला. कोणीतरी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे सांगितले. मी इथे सांगू इच्छितो की, मी जेव्हा लोकांमध्ये होतो तेव्हा खूप घोषणा दिल्या जात होत्या, पण मी पाकिस्तान झिंदाबादचा नारा कधीच ऐकला नाही, पण काहीही असो, आम्ही पोलिसांना तपास करायला सांगितले आहे, असेही ते म्‍हणाले.

हुसैन म्हणाले, ‘जर कोणी अशा घोषणा दिल्या असतील तर त्याच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई झाली पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे. एखाद्याने व्हिडिओ मॉर्फ केला असेल किंवा छेडछाड केली असेल आणि गैरवर्तन केले असेल, तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे.जर कोणी घोषणा दिल्या असतील तर ती व्यक्ती कोण आहे, ती कुठून आली आहे, ती व्यक्ती आवारात कशी घुसली आणि त्या घोषणा देण्यामागे त्याचा हेतू किंवा हेतू काय होता, याचा योग्य तपास व्हायला हवा. याची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्‍यांनी केली आहे.

 

 

Back to top button