Gujarat | गुजरातच्या पोरबंदरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, ३,३०० किलो ड्रग्जसह ५ जणांना अटक | पुढारी

Gujarat | गुजरातच्या पोरबंदरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, ३,३०० किलो ड्रग्जसह ५ जणांना अटक

पुढारी ऑनलाईन : गुजरातमधील पोरबंदर येथे एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने एक संयुक्त मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय असलेल्या ५ क्रू मेंबर्सना ३,३०० किलो ड्रग्जसह अटक केली आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात हजारो कोटी रुपये किंमत आहे. आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

समुद्रातील केलेल्या या संयुक्त कारवाईत, भारतीय नौदलाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या समन्वयाने सुमारे ३,३०० किलो कॉन्ट्राबँड (३,०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिन) घेऊन जाणारी एक संशयित बोट पकडली. पाळत ठेवणाऱ्या P8I LRMR विमानाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तैनात केलेले जहाज अवैध मालाच्या तस्करीचा संशय असलेली बोट थांबवण्यासाठी वळवण्यात आले. या कारवाईदरम्यान जप्त केलेला ड्रग्जसाठा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे.

एनसीबीसह भारतीय नौदलाने केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेली बोट आणि खलाशी आणि ड्रग्जसाठा भारतीय बंदरात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या संबंधित एजन्सीकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

याआधी पुणे आणि नवी दिल्ली येथे दोन दिवसांच्या छाप्यांमध्ये २,५०० कोटी किमतीचे तब्बल १,१०० किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर एका आठवड्यानंतर आता मोठ्या एका आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुण्यात ७०० किलो मेफेड्रोन आणि दिल्लीत ४०० किलो बंदी असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

हे ही वाचा :

 

Back to top button