भारत जोडो न्याय यात्रेत उद्या प्रियंका गांधी सहभागी होणार

file photo
file photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात उद्या (शनिवार) भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. मुरादाबादपासून अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलीगड, हाथरस, आगरा, फतेहपुर सीकरी या भागात त्या यात्रेत सहभागी असणार आहेत.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातून प्रवास करत आहे. उत्तर प्रदेशच्या विविध भागातून यात्रा प्रवास करत असताना प्रियंका गांधी उद्या यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीची घोषणाही अलीकडेच करण्यात आली आहे. त्यांनंतर अखिलेश यादव यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक पत्र अखिलेश यादव यांना लिहिले आहे. अखिलेश यादव हे देखील राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होतील आणि सभेतही सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत जोडो न्याय यात्रेत १६ फेब्रुवारीला चंदौलीमध्ये यात्रेचे स्वागत करण्यासाठी प्रियंका गांधी उपस्थित राहणार होत्या. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली होती.

गेले काही दिवस प्रियंका गांधी यात्रेत का सहभागी होत नाही, यावरून अनेक चर्चा होत्या. काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले होते. त्यात प्रियंका गांधी यांना सरचिटणीस पद देण्यात आले, मात्र कुठल्याही राज्याची किंवा विभागाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. पक्षात त्या एकमेव सरचिटणीस आहेत, ज्यांना कुठल्याही विभागाची जबाबदारी देण्यात आली नाही.  उत्तर प्रदेशच्या प्रभारी असतानाही त्यांच्याकडे राज्याचा कारभार नव्हता, असा दावा काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला होता. त्यामुळे खरंच प्रियंका गांधी नाराज आहेत का? आणि म्हणून गेल्या दीड महिन्यापासून त्या यात्रेत सहभागी झाल्या नाहीत का? अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. प्रियंका गांधी उद्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news